वाढदिवस विशेष: दुसरा हर्षा होणे नाही..

-आदित्य गुंड (Twitter – @AdityaGund)

ऑस्ट्रेलियन ओपनचा कुठलासा सामना सुरु आहे. प्रेक्षकांमध्ये एक ऑस्ट्रेलियन आणि एक भारतीय माणूस बसलेला आहे. अचानक जवळ बसलेली एक ऑस्ट्रेलियन मुलगी उठून त्या भारतीय माणसाकडे येऊन विचारते,

“माफ करा. तुम्ही हर्षा भोगले आहात का?”

तो भारतीय माणूस होकारार्थी मान डोलवतो. लगेचच बातमी पसरते आणि त्या भारतीय माणसाभोवती ऑस्ट्रेलियन लोक सहीसाठी कोंडाळे करतात. एखाद्या समालोचकाला असे भाग्य, तेही ऑस्ट्रेलियात क्वचितच मिळते.

भारतासारख्या देशात किंवा जगभरातच क्रिकेटपटूंना प्रसिद्धीचे वलय फार लवकर लाभते. केवळ आणि केवळ समालोचनाच्या जोरावर प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचलेल्या मोजक्या लोकांमध्ये हर्षाचा समावेश होतो. आजघडीला रिची बेनॉ, टोनी ग्रेग यांच्यासारख्या दिग्गजांच्या बरोबरीने हर्षाचे नाव घेतले तर आश्चर्य वाटायला नको. त्याला कारणही तसेच आहे.

समालोचन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीयांचा फारसा वावर नसताना १९९२ मध्ये ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनने हर्षाला भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी समालोचनाचे निमंत्रण दिले. भारताबाहेर समालोचन करणारा पहिला भारतीय म्हणून हर्षाची ओळख याचमुळे आहे. जरी एबीसीबरोबर १९९२ मध्ये काम सुरु केलं तरी हर्षाने समालोचनाची सुरुवात मात्र त्याअगोदरच ऑल इंडिया रेडिओसाठी १९८१ मध्ये केली. त्यावेळी त्याने एका रणजी सामन्यासाठी समालोचन केले. दरम्यान उस्मानिया विद्यापीठातून त्याने केमिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली. त्यानंतर आयआयएम मधून एमबीए करून रिडिफ्युजन नावाच्या एका जाहिरात कंपनीत नोकरी धरली. तिथे दोन वर्षे काढल्यानंतर त्याने स्पोर्ट्स मॅनेजमेंट ग्रुप या कंपनीत काही काळ काम केले. त्यानंतर मात्र हर्षाने नोकरीच्या फंदात न पडता स्वतःच लढायचे ठरवले आणि खऱ्या अर्थाने त्याचा प्रवास सुरु झाला. तेव्हापासून सुरु झालेला हर्षाचा हा प्रवास ४५० एकदिवसीय आणि १५० हून अधिक कसोटी सामन्यांनंतरही आजतागायत अव्याहतपणे सुरु आहे.

हर्षा आपल्या क्षेत्रात आज बादशाह आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र बादशाह होण्यासाठीचा त्याचा प्रवास मात्र खडतर होता. एबीसीच्या ऑस्ट्रेलियामधील संधीने त्याला खूप काही शिकायला मिळाले तरी पैसे मात्र मिळाले नाहीत. त्यावेळी देशाबाहेरील समालोचकांना मानधन मिळत नसे. स्वतःच्या प्रवासाचा खर्च भागवण्यासाठी हर्षा दिवसाला दोन लेख लिही. लंचमध्ये ‘आफ्टरनून डिस्पॅच अँड कुरिअर’ साठी एक लेख आणि दिवसाचा खेळ संपताना ‘इंडियन एक्स्प्रेस’ साठी एक लेख. दोन कसोटी सामन्यांच्या मध्येही एका मासिकासाठी तो लेख लिहीत असे.

ही सगळी कसरत अपेक्षेपेक्षा जास्त दिवस सुरु राहिली. भारताच्या १९९३ सालच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी हर्षा ऑल इंडिया रेडिओ तर्फे समालोचन करण्यासाठी गेला. या ट्रिपचा खर्च भागवण्यासाठी हर्षा बीबीसीसाठी रिपोर्टींग करे. दिवसाचा खेळ संपला की हर्षा घाईने त्याचा मॅच रिपोर्ट तयार करून तो फॅक्स करीत असे. त्यावेळी इकडे भारतात त्याची बायको अनिता फॅक्सची वाट पाहत बसलेली असे. अनेकदा फॅक्स दोन तीन वेळा पाठवावा लागे. त्यासाठी तेवढा जास्त खर्च करावा लागे पण इतर काही पर्याय नसे. हर्षाचा फॅक्स आला की अनिता त्याची झेरॉक्स करून पुन्हा तो मॅच रिपोर्ट आघाडीच्या दैनिकांना पाठवे. हे सगळे करून घरी यायला तिला अनेकदा रात्रीचे अकरा वाजत. चांगल्या कामाची पावती कधी ना कधी मिळते म्हणतात त्याप्रमाणे हळूहळू तेही दिवस सरले आणि अधिकाधिक चांगल्या संधी उपलब्ध होत गेल्या.

दरम्यान रेडिओ बरोबरच टीव्हीसुद्धा आले आणि हर्षासाठी अजून एक मोठी संधी निर्माण झाली. हर्षाने फक्त विद्यापीठ पातळीवर क्रिकेट खेळले असले तरी त्याचे समालोचन ऐकताना कुणालाही त्याच्याशी कर्तव्य नसते. स्वतः हर्षाने हे फार लवकर जाणले आणि अनेक दिग्गज क्रिकेटपटूंसोबत समालोचन करण्याचे कुठलेही दडपण स्वतःवर येऊ दिले नाही. त्यामुळेच तो कदाचित इतका यशस्वी होऊ शकला.

एक समालोचक म्हणून हर्षा इतरांपेक्षा प्रचंड पुढे असतो.समोर घडत असलेल्या घटनांविषयी अद्ययावत माहिती स्वतःकडे असावी यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. मोहनदास मेनन या आघाडीच्या सांख्यिकीतज्ञाने हर्षाचे वर्णन असे केले आहे,

“कुठलीही आकडेवारी समजून घेण्याची हर्षाची क्षमता ही इतरांपेक्षा वाखाणण्याजोगी आहे. तो अनेकदा आम्हाला कामाला लावतो.”

स्वतः इंजिनियर असल्याने हर्षाला कदाचित हे सोपे जात असावे.

एक समालोचक म्हणून तुम्ही तटस्थ असणे अपेक्षित असते. हर्षा हे अगदी सहज आणि योग्यपणे करतो. समोर घडत असलेल्या घटनांचे वर्णन करताना आपण भारतीय आहोत हे विसरून हर्षा बोलत असतो. ते करताना अनेकदा प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंची स्तुती करणे क्रमप्राप्त असते. हार जीत हा खेळाचा भाग आहे म्हणणारे समर्थक समालोचनाबाबत मात्र अशी भूमिका घेताना दिसत नाहीत. नेमका याचाच फटका हर्षाला बसला. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंची स्तुती केली आणि भारतीय संघातील खेळाडूंवर टीका केली म्हणून स्वतः धोनी हर्षावर नाराज झाला. अगदी अमिताभने ट्विट करून हर्षाच्या समालोचनाबद्दल आपली नाराजी प्रकट केली. धोनीने अमिताभचे ट्विट रिट्विट करून त्याला आपला पाठिंबा दर्शवला. या सगळ्याची परिणती हर्षाच्या गच्छन्तीत झाली. हर्षानेही आपले म्हणणे एका पोस्टद्वारे माडंले आणि तीन ट्विट रिट्विट केले. एवढं सोडलं तर स्वतःच्या समर्थनार्थ त्याने काहीही केले नाही. मात्र इतक्या वर्षांची ‘चांगला माणूस’ ही त्याची प्रतिमा त्यावेळी नेमकी आड आली. काही काळापुरता का होईना हर्षा व्हिलन झाला. त्याने हे प्रकरण अतिशय शांतपणे हाताळले. हर्षा सारख्या हिऱ्याला समालोचनापासून कुणीही दूर ठेवू शकले नाही. लवकरच तो पुन्हा समालोचन करू लागला.

हर्षाबद्दल अजून एक आवडणारी गोष्ट म्हणजे विविध समाजमाध्यमांवर त्याचा असलेला लिलया वावर. तो समालोचन जितक्या सहजतेने करतो, तितक्याच सहजतेने तो लेख लिहितो, तितक्याच सहजतेने तो ट्विटर आणि फेसबुकवर आपले म्हणणे मांडतो.

समालोचन करताना हर्षाने उच्चारलेल्या वाक्यांची जंत्री इंटरनेटवर उपलब्ध आहे. जादूगाराने टोपीतून ससा वगैरे काढावा तशी हर्षा एकामागोमाग वाक्ये फेकत असतो. सचिन बॅटिंगला आल्यावर जसा देश थांबायचा तसं काहीसं हर्षाच्या बाबतीतही होते. हर्षा माईकवर असला की चॅनेल बदलणारा माणूस सापडणे अशक्यप्राय आहे. हर्षा माईकवर असताना आज हा काय खास बोलणार? कोणती वाक्ये वापरणार? यासाठी अनेकजण कान टवकारून असतात. समालोचन करताना उच्चारलेल्या वाक्यांनी ट्विटरवर ट्रेंडिंग असणारा हर्षा हा बहुधा पहिला समालोचक असेल. समालोचनाचे दिग्गज ज्यांना मानले जाते त्या टोनी ग्रेग, अॅलन विल्किन्स अशा लोकांसोबत सहज वावरलेला हर्षा आज अतिशय टुकार समालोचन करणाऱ्या सेहवाग, आकाश चोप्रा ह्यांनाही सहन करतो तेव्हा त्याच्याबद्दल अजूनच कौतुक वाटतं.

सचिनच्या निवृत्तीच्या सामन्यात सगळं वानखेडे “सचिन,सचिन” म्हणून ओरडत असतानाही हर्षा काय बोलतोय याकडे लोकांचं लक्ष होतं यात त्याचं मोठेपण आलं. क्रिकेटचा देव मानला गेलेला खेळाडू जेव्हा त्याच्या कारकिर्दीचा शेवट करतो आहे तेव्हा समालोचक म्हणून आपल्याकडे काय जबाबदारी आहे हे हर्षाने ओळखले. सचिनला त्याचा वेळ देत त्याने सचिनला बोलते केले. स्वतः सचिनच्या खेळाचा निस्सीम चाहता असूनही आपल्या जबाबदारीशी प्रामाणिक राहत त्याने केवळ आपल्या समालोचनाने जगभरातल्या सचिन समर्थकांच्या डोळ्यात पाणी आणले. सचिन आपलं भाषण संपवून पुन्हा एकदा खेळपट्टीकडे गेला. तो तिथे पोहोचेपर्यंत हर्षा बोलत होता. ज्या क्षणी सचिन खेळपट्टीला वंदन करायला वाकला, त्याक्षणी हर्षा थांबला. हा क्षण सचिनचा आहे आणि तो त्याचाच राहील याची खबरदारी घेत तो शांत राहिला. सचिन पुन्हा पॅव्हेलियनकडे चालू लागल्यावर त्याने आपले वाक्य पूर्ण केले. सचिन वाकला तेव्हा कदाचित हर्षानेही आवंढा गिळला असेल. या कृतीतून हर्षाने आपल्यातल्या सचिनप्रेमी आणि तितक्याच व्यावसायिक दृष्टिकोनाच्या समालोचकाचे दर्शन घडवले.

क्रिकेटमध्ये अनेक महान खेळाडू होऊन गेले, अजूनही आहेत आणि यापुढेही होतील. या सगळ्यांचा विषय निघतो तेव्हा त्यांचा मोठेपणा सांगायला अनेकांची स्पर्धा लागते. वेगवेगळ्या सामन्यांचे दाखले दिले जातात. या सामन्यांबरोबरच अमुक अमुक समालोचन करताना काय म्हणाला होता याचीही आठवण दिली जाते. क्रिकेटपटूंना महान बनवण्यात त्यांच्या खेळाचा मोठा वाटा असला तरी त्यांच्या खेळाचे रसभरीत वर्णन करणाऱ्या समालोचकांचाही थोडाफार वाटा असतोच. भारताचे अनेक क्रिकेटपटू आपल्या मोठेपणाचे थोडेतरी श्रेय हर्षाला देत असतील याची मला खात्री आहे.

केवळ आपल्या समालोचनाच्या बळावर हर्षा आज इथपर्यंत पोहोचला आहे. या देशात एकवेळ दुसरा सचिन तेंडुलकर होईल, मात्र दुसरा हर्षा भोगले होणे नाही.