आऊट की नॉट आऊट??

शनिवारी क्रिकेट विश्वातील एक अविश्वसनीय घटना घडली. त्यात मूनी व्हॅली कडून खेळत असलेल्या जतिंदर सिंगला आऊट देण्यात आले जेव्हा स्टंपवरील सर्व बेल्स जागेवरच होत्या परंतु मधला स्टंप खाली पडला होता. स्ट्रेथमोर हाईट्स संघाविरुद्ध मिड इयर असोसिएशनच्या सामन्यात मूनी व्हॅली जतिंदर सिंगला पंचानी बरीच चर्चा करून आऊट घोषित केलं.

याबद्दल बोलताना मूनी व्हॅलीचा कर्णधार मिचएल ओझबुनने सविस्तर किस्सा सांगितला. तो म्हणाला, ” ही घटना घडली तेव्हा थोडी चर्चा नाही. पंचही संभ्रमात पडले होते. यापूर्वी कुणीही असं काही पाहिलं नव्हतं. मी त्यावेळी मैदानाच्या एका कोपऱ्यात होतो. मला वाटलं जतिंदर सिंग त्रिफळाचित झाला आहे. तो त्रिफळाचित होण्याचं कारण तो एक खराब शॉट होता. परंतु काही वेळात सर्वजण स्टंपच्या बाजूला जमा झाले. असं का झालं याच कारण मला समजेना. तेव्हा मीही स्टंपजवळ गेलो तर ती घटना खरंच गोंधळात टाकणारी होती. “

या सर्व घटनेत दोन्ही संघानी चर्चा करून फलंदाज आऊट असल्याचं मान्य केलं. नंतर जेव्हा क्रिकेटची नियमावली पाहण्यात आली तेव्हा तो एक बरोबर निर्णय होता.

 

मिचएल ओझबुन पुढे म्हणाला, ” आम्हाला क्रिकेटच्या नियमाप्रमाणे काय बरोबर काय चूक माहित नव्हते. परंतु जे घडलं त्याला आम्ही दाद दिली. अश्या घटना सारख्या सारख्या घडत नाही. आपण परत प्रयत्न केले तरीही बेल्स जागेवर ठेवून आपण स्टंप खाली पाडू शकत नाही. बाकी दोन स्टंपच्या दाबामुळे एखाद्यावेळी त्या बेल्स खाली पडल्या नसतील.”

क्रिकेटचा नियम काय सांगतो?
क्रिकेटचा नियम २९ प्रमाणे जर बेल्स स्टंपच्या वरच्या भागापासून पूर्णपणे वेगळ्या झालेल्या असेल किंवा स्टंप जमिनीवर खाली पडला असेल तर फलंदाजाला आऊट देण्यात यावे.

 मूनी व्हॅलीने हा सामना ४ विकेट्स राखत १९६ धावांच लक्ष पार करत जिंकला.

 
यापूर्वी असा प्रसंग घडला आहे का?

काहीसा असाच प्रसंग यापूर्वीही घडला होता परंतु त्यात फलंदाज चुकीच्या पद्धतीने बाद देण्यात आला.
गेराल्डटन जुनिअर क्रिकेट असोशिएशनच्या अंडर १७ वयोगटातील गेल्या वर्षीच्या एका सामन्यात ब्लफ पॉईंट चंपेन व्हॅलीच्या जॅकोबी अनबेहनला चुकीच्या पद्धतीने बाद देण्यात आले. जॅकोबी जेव्हा खेळत होता तेव्हा स्टम्पवरील एक बेल हवेत जाऊन डाव्या स्टम्पवर स्थिरावली. नियम क्रमांक २८ प्रमाणे जॅकोबी तेव्हा नाबाद होता.