न्यूजीलँड विरुद्धच्या सराव सामन्यात भारताचे हे फलंदाज चमकले

मुंबई। भारत विरुद्ध न्यूजीलँड संघात २२ ऑक्टोबर पासून ३ वनडे आणि ३ टी २० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंड संघ अध्यक्षीय संघाविरुद्ध २ सराव सामने खेळणार आहे. त्यातील पहिला सराव सामना आज मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात अध्यक्षीय संघाने न्यूजीलँडला २९६ धावांचे लक्ष्य दिले आहे.

या सामन्यात न्यूजीलँड संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षीय संघाच्या केएल राहुल आणि पृथ्वी शॉ या सलामीच्या जोडीने मात्र या निर्णयाला चुकीचे ठरवत शतकी भागीदारी रचली. त्यांनी १४७ धावांची भागीदारी केली.

भारतीय संघातून वगळण्यात आलेल्या केएल राहुलने सलामीला येऊन ६८ धावा केल्या. राहुलच्या पाठोपाठ लगेचच प्रतिभावान युवा खेळाडू पृथ्वी शॉ बाद झाला. त्यानेही अर्धशतकी खेळी करताना ६६ धावा केल्या.

त्यानंतर संघाची जबाबदारी आली ती कर्णधार श्रेयश अय्यर आणि करूण नायरवर. परंतु श्रेयश अय्यरने आपली विकेट १७ धावांवर असतानाच गमावली, नायरने मात्र आपला खेळ चालू ठेवत ७८ धावांची खेळी केली.

अध्यक्षीय संघाने शेवटच्या काही षटकांमध्ये मात्र आपले बळी गमावले. न्यूजीलँड गोलंदाज ट्रेंट बोल्टने ३८ धावा देत ५ बळी घेत अध्यक्षीय संघाला ९ बाद २९५ धावांवर रोखले.

या सामन्यात भारतीय युवा फलंदाज केएल राहुल, करूण नायर आणि पृथ्वी शॉ मात्र चमकून गेले.