रॉजर फेडररला पराभवाचा धक्का देत बोर्ना कोरिचचा शांघाय मास्टर्सच्या अंतिम फेरीत प्रवेश

शांघाय मास्टर्सच्या उपांत्य फेरीत क्रोएशियाच्या बोर्ना कोरिचने रॉजर फेडररचा 6-4, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत त्याचा सामना यावर्षीचा युएस ओपन विजेता नोवाक जोकोविचशी उद्या (14 ऑक्टोबर) होणार आहे.

कोरिचचा हा पहिलाच मास्टर्स 1000चा अंतिम सामना आहे. तसेच कोरिच हा दुसऱ्यांदाच उपांत्य फेरीत खेळत होता. या वर्षाच्या सुरूवातीला तो बीएनपी पॅरिबॅस ओपनच्या उपांत्य फेरीत खेळला होता. यावेळी त्याला फेडररनेच तीन सेटच्या थरारक सामन्यात 5-7, 6-4, 6-4 असे पराभूत केले होते.

मास्टर्स 1000चे या हंगामातील सर्वाधिक सामने जिंकणारा कोरिच (8-14) हा फक्त तिसराच टेनिसपटू आहे. याआधी अशी कामगिरी झ्वेरेव (22-7) आणि जोकोविच (19-6) यांनीच केली आहे.

या सामन्यात फेडररला एकही ब्रेक पॉईंट मिळवता आला नाही. तर कोरिच आधीपासूनच आक्रमक खेळत होता. पहिल्या सेटवर त्याचेच वर्चस्व होते. त्याने फेडररला सावरण्याचा वेळच दिली नाही.

दुसऱ्या सेटमध्ये तरी फेडरर मुसंडी मारेल असे वाटले असताना कोरिचने त्याचा नैसर्गिक खेळ सुरूच ठेवला. सर्व्ह करताना कोरिचने या सामन्यात फक्त नऊ पॉइंट्स गमावले आहे.

“हा सामना जरी माझ्या आयुष्यातील पहिल्या क्रमांकाचा सर्वोत्तम सामना नसला तरी तो नक्की दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाचा आहे. या सामन्यात केलेल्या सर्व्ह ह्या माझ्या आतापर्यंतच्या उत्कृष्ठ सर्व्ह होत्या”, असे कोरिच म्हणाला.

सध्या कोरिच एटीपी क्रमवारीत 18व्या स्थानावर आहे. पण तो सोमवारी (15 ऑक्टोबर) येणाऱ्या ताज्या एटीपी क्रमवारीत तो 13व्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ठ क्रमांकावर जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

भारत-चीन फुटबॉल सामना बरोबरीत सुटला

नोवाक जोकोविचचा शांघाय मास्टर्सच्या अंतिम फेरीत प्रवेश

टिम इंडियाला मोठा धक्का; मुंबईकर शार्दुल ठाकुर हैद्राबाद कसोटीतून बाहेर