८२ वर्षांनी टीम इंडियाला अनुभवयाला मिळाला हा सुवर्णक्षण

मेलबर्न। आजपासून(26 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय योग्य ठरवताना भारताच्या हनुमा विहारी आणि मयंक अगरवाल या नवीन सलामीवीर जोडीने चांगली सुरुवात केली. याबरोबरच हे दोघे जेव्हा मैदानावर सलामीसाठी उतरले तेव्हा त्यांच्या नावावर खास विक्रमाचीही नोंद झाली आहे.

विहारी आणि अगरवाल हे दोघेही भारताकडून पहिल्यांदाच कसोटीमध्ये सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरले आहेत. त्यामुळे भारताकडून दोन्ही खेळाडूंनी एकाचवेळी पहिल्यांदा सलामीला फलंदाजी करण्याची ही भारताच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील केवळ तिसरी वेळ आहे.

याआधी असे फक्त दोन वेळा झाले आहे. 1932 साली भारताने जेव्हा इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्समैदानावर पहिला कसोटी सामना खेळला तेव्हा पहिल्यांदा असे झाले होते. त्या सामन्यात जनार्दन नवले आणि नूमल जूमल यांनी भारताकडून पहिल्यांदा सलामीला फलंदाजी केली होती.

त्यानंतर लॉर्ड्स मैदानावरच भारताच्या पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंड विरुद्ध 1936 मध्ये विजय मर्चंड आणि दत्ताराम हिंदळेकर ही फलंदाजांची जोडी भारताकडून एकाचवेळी पहिल्यांदाच सलामीला फलंदाजीसाठी उतरली होती.

त्यानंतर जवळ जवळ 82 वर्षांनी आज भारताचे दोन्ही खेळाडू एकाचवेळी पहिल्यांदा कसोटीमध्ये सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरले आहेत. यावेळी अगरवाल आणि विहारी या दोघांनी 40 धावांची सलामी भागीदारी रचली. पण ही भागीदारी रंगत असताना 18 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पॅट कमिन्सने विहारीला 8 धावांवर असताना बाद केले.

या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात 28 षटकात 1 बाद 57 धावा केल्या आहेत. अगरवाल  34 धावांवर आणि पुजारा 10 धावांवर नाबाद आहे.

भारताकडून एकाचवेळी पहिल्यांदा सलामीला फलंदाजी करणारी फलंदाजांची जोडी – 

1932 – जनार्दन नवले आणि नूमल जूमल (भारत विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स)

1936 – विजय मर्चंड आणि दत्ताराम हिंदळेकर (भारत विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स)

2018 – हनुमा विहारी आणि मयंक अगरवाल ( भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न)

महत्त्वाच्या बातम्या:

२०१८मध्ये क्रिकेटमध्ये झाले हे मोठे ५ वाद

हे ५ तरुण खेळाडू २०१९मध्ये होऊ शकतात टीम इंडियाचे शिलेदार

जर टीम इंडियाने कसोटी जिंकली तर आयसीसी क्रमवारीत होणार हे मोठे बदल