जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार हे सर्वोत्तम गोलंदाज: रोहित शर्मा

भारताने  कानपूर येथील वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या संघाला ६ धावाने पराभूत केले आणि मालिका आपल्या नावावर केली. या मालिकेत भारताने २ सामने जिंकले तर न्यूझीलंडने १ सामना जिंकला. 

 या मालिकेचा मालिकावीर ठरला भारताचा कर्णधार विराट कोहली, त्याने या मालिकेत २ शतके केली होती तर या मालिकेतील शेवटच्या सामन्याचा सामनावीर ठरला भारताचा उपकर्णधार  रोहित शर्मा. रोहितने या शेवटच्या सामन्यात १४७ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. 

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला की,”भारताची गोलंदाजी ही खूपच भक्कम आहे आणि त्याचे प्रमुख कारण म्हणजे भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा आहे. या दोघांच्या चांगल्या कामगिरीमुळेच भारताने ही मालिका जिंकली आहे.”

शेवटच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने चांगली गोलंदाजी केली नाही, पण दुसऱ्या बाजूला जसप्रीत बुमराने उत्तम गोलंदाजी करत भारताला ६धावांनी विजय मिळवून दिला. बुमराने फक्त विकेट्स मिळवल्या नाहीत तर यॉर्कर गोलंदाजी करून फलंदाजांना बांधून ठेवले.

न्यूझीलंड संघाला मालिका आणि सामना जिंकण्यासाठी १८ चेंडूमध्ये ३० धावा हव्या होत्या आणि असे केल्यास न्यूझीलंड भारतातील पहिली मालिका जिंकला असता. पण बुमराच्या यष्टी भेदी यॉर्कर समोर न्यूझीलंडच्या कोणत्याच फलंदाजांचा टिकाव लागला नाही. 

भारताने न्यूझीलंडविरुद्धची ही मालिका जिंकून सलग ७ मालिका जिंकण्याचा विक्रम तयार केला आहे. भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा म्हणाला भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांच्या जोडीशिवाय भारत लगातार ७ मालिका जिंकू शकला नसता.

“आमच्याकडे आता शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्यासाठी जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार यांनी ऑस्ट्रेलियाच्या मालिकेतही उत्तम गोलंदाजी केली आहे. तुम्ही जर का ऑस्ट्रेलियाचा संघ बघितला तर त्याच्या फलंदाजीत अनेक असे फलंदाज आहेत जे की धडाकेबाज फलंदाजी करू शकतात. पण त्यांनाही जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार यांनी रोखून धरले होते. याही मालिकेत आम्ही मुंबईमधील पहिला सामना हरल्यानंतर पुणे आणि कानपूर येथे या दोघांच्या ही चांगल्या गोलंदाजीच्या बळावर सामना आणि मालिका जिंकलो.”

“परवाच्या सामन्यातही खूप दव पडल्यामुळे चेंडू ओला झाला होता आणि चेंडूवर नियंत्रण मिळवणे खूप अवघड झाले होते. तरी सुद्धा या दोन्ही गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना फक्त रोखूनच नाही धरले तर लगातार विकेट्सही मिळवल्या. तसं बघायला गेलं तर टी२०च्या उदयानंतर ३ षटकात ३० धावा करणे अवघड नाही. पण आमच्याकडे जगातील सर्वोत्तम गोलंदाज होते त्यामुळे आमचा आत्मविश्वास होता की आम्ही हा सामना आणि मालिका नक्की जिंकू.”

मागील मालिकेतील ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ याने भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा या दोघांना शेवटच्या षटकातील सर्वोत्तम गोलंदाज असे संबोधले होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताने पहिले तिन्ही सामने जिंकून मालिका आधीच खिशात टाकली होती पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करत १ सामना जिंकला आणि संपूर्ण मालिकेत फक्त एकच सामना ऑस्ट्रेलिया जिंकू शकली. पण न्यूझीलंडने मात्र भारताला पहिल्याच सामन्यात दबाव खाली आणले होते आणि पुढील दोन्ही सामने भारताला मालिका जिंकण्यासाठी गरजेचे होते. अशा दबावाच्या सामन्यांमध्येही जसप्रीत  आणि भुवनेश्वर कुमार यांनी चांगली गोलंदाजी करत भारताला यश मिळवून दिले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विजयानंतर भारताने न्यूझीलंडलाही वनडे वनडे मालिकेत हरवले या दोन्ही मालिकांपैकी कोणत्या संघाला हरवणे जास्त अवघड होते असे विचारले असता रोहित म्हणाला, “आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही संघाला हरवणे सोपे नसते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही ऑस्ट्रेलियाने आम्हाला अनेकदा अडचणीत टाकले पण आम्ही त्याविरुद्ध चांगला खेळ केला आणि मालिका जिंकली. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पहिल्याच सामन्यात आम्हाला वानखेडेवर हार पत्करावी लागली. माझ्या मते आम्ही वानखेडेवर चांगली फलंदाजी करू शकलो नाही. वानखेडेच्या सपाट मैदानावर २८० धावा कधीच पुरेशा नसतात. पण पुढील सामन्यात पुढील दोन्ही सामन्यात आम्ही पुनरागमन केले आणि न्यूझीलंडला हरवून मालिका आमच्या नावावर केली. या संघात अवघड परिस्थितीतून बाहेर येण्याची ताकद आहे आणि हे आम्ही दाखवून दिले.”