आयपीएल २०१८: चेन्नईचा हा महत्वाचा खेळाडू पुढील दोन सामन्यांना मुकणार

चेन्नई। आयपीएलमध्ये दोन वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचा महत्वाचा खेळाडू दुखापत ग्रस्त झाल्याने पुढील दोन सामन्यांना मुकणार आहे.

परवा पार पडलेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यादरम्यान चेन्नईचा आक्रमक फलंदाज सुरेश रैनाला पायाच्या पोटरीमध्ये क्रॅम्प आला होता. त्यामुळे त्याला या सामन्यात धावा करताना त्रास होत होता.

त्यामुळे आता रैनाला पुढील दोन सामन्यांना म्हणजेच १५ एप्रिलला किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या आणि २० एप्रिलला राजस्थान विरुद्धच्या सामन्यांना मुकावे लागणार आहे.

याबद्दल चेन्नई सुपर किंगच्या ट्विटर अकाउंटवरून माहिती देण्यात आली आहे. त्यात त्यांनी सांगितले आहे की कोलकाता विरुद्धच्या सामन्यादरम्यान झालेल्या पोटरीच्या दुखापतीमुळे रैनाला पुढील दोन सामन्यात खेळता येणार नाही.

रैनाने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात १२ चेंडूत १४ धावा केल्या होत्या. त्याला आयपीएल २०१८ मध्ये आत्तापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यात धावा करण्यात अपयश आलेले आहे. तरीही रैना आयपीएलमधील सर्वाधिक सामने खेळणारा आणि सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असल्याने त्याचे संघाबाहेर असणे चेन्नईसाठी मोठा धक्का आहे.

आता या दोन सामन्यात रैना ऐवजी मुरली विजयला ११ जणांच्या संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. मुरलीला जर संधी मिळाली आणि त्याला सलामीला पाठवले तर अंबाती रायडूला रैनाच्या जागेवर म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर खेळवले जाऊ शकते

याआधीच चेन्नईचा केदार जाधव दुखापतीमुळे आयपीएलमधूनच बाहेर पडला आहे. त्याला मुंबई विरुद्ध पहिल्या सामन्याच्या वेळी दुखापत झाली होती. त्यामुळे चेन्नईसाठी हा दुसरा धक्का आहे.