भारताला मिळणार का कसोटी मालिकेत निर्भेळ यश?

भारत  आज शनिवारी श्रीलंकेविरुद्ध या कसोटी मालिकेतली तिसरी आणि शेवटची कसोटी कॅंडी येथील पल्लेकेल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवून भारताने ही मालिका आधीच जिंकली आहे. आता उद्याचा सामना जिंकून भारत श्रीलंकेवर निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न करेल.

भारताला शेवटच्या सामन्यात आधीच एक मोठा झटका लागला आहे तो म्हणजे जागतिक कसोटी क्रमवारीत नंबर १ गोलंदाज रवींद्र जडेजाला हा सामना खेळता येणार नाही. मागील सामन्यात गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याला एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. आता त्याच्या जागी भारतीय संघात संधी देण्यासाठी संघ व्यवस्थापनकडे दोन पर्याय आहेत.

एक म्हणजे कुलदीप यादव ज्याने आजपर्यंत फक्त १ कसोटी सामना खेळला आहे. ज्यात त्याने दोन डावात ४ विकेट्स घेतल्या होत्या. तर दुसरा पर्याय म्हणजे अक्षर पटेल. याला जर संधी दिली तर तो भारताकडून कसोटी खेळणारा २९०वा खेळाडू बनेल. अक्षर पटेल हा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ११६३ धावा केल्या आहेत तर ७९ विकेट्स ही घेतल्या आहे.

जडेजा हा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि कुलदीप यादव हा एक चायनामन फिरकी गोलंदाज आहे. आता पाहुयात एका अष्टपैलू खेळाडूच्या बदल्यात संघ व्यवस्थापन एका मुख्य गोलंदाजाला संधी देईल का ?

दुसऱ्या बाजूला पाहायला गेल तर श्रीलंकेचा संघ चारही बाजूने संकटात सापडला आहे. पहिल्या सामन्यात त्यांचा कर्णधार दिनेश चंडिमल खेळू शकला नाही तर तिसऱ्या सामन्यात त्यांचा अनुभवी गोलंदाज रंगाना हेराथ खेळणार नाही. त्याच बरोबर त्यांचा वेगवान गोलंदाज नुवान प्रदीप दुसऱ्या सामन्या दरम्यान दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेला आहे. फलंदाजीत सर्वात अनुभवी उपुल तरंग अतिशय खराब फॉर्ममधून जात आहे तर अँजेलो मॅथ्युजला ही अजून या मालिकेत सूर गवसला नाही.

मागील ५ सामन्यातील कामगिरी:

श्रीलंका
हार, हार, विजय, हार, विजय.

भारत
विजय, विजय, विजय, अनिर्णित, विजय.

स्पॉटलाइट मधील खेळाडू:

भारत

चेतेश्वर पुजारा

पुजाऱ्याने आतापर्यंत या मालिकेत अप्रतिम फलंदाजी केली आहे. त्याने पहिल्या दोनही कसोटी सामन्यात शतक लगावले आहे आणि भारताला आता त्याच्याकडून शेवटच्या सामन्यात देखील अशीच कामगिरीरची अपेक्षा आहे.

श्रीलंका

दिमुथा करुणारत्ने

श्रीलंकेच्या सर्व फलंदाजांपैकी फक्त करुणारत्ने हा एकमेव फलंदाज आहे जो सकारात्मकरित्या खेळत आहे आणि त्याने मागील सामन्यात श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात शतकही लगावले आहे.

संभाव्य संघ:

श्रीलंका : उपुल थरंगा, दिमुथ करुर्तेत्ले, कुसेल मेंडिस, दिनेश चंदिलाल, अँजेलो मॅथ्यूज, लाहिरू थिरीमाने / धनंजय दे सिल्वा, निरातोन डिकवेल, दिलरुवान परेरा, लक्ष्मण संदकन, विश्व फर्नांडो / लाहिरू कुमारा, लाहिरू गमगे / दुश्मंत चामरा

भारत: शिखर धवन, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, वृद्धिमान साहा,हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी