ISL 2017: पुण्याच्या स्ट्रायकर्सचा धडाका जमशेदपूचे बचावपटू रोखणार??

जमशेदपूर: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये पहिल्या विजय नोंदविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या जमशेदपूर एफसीची रविवारी एफसी पुणे सिटीविरुद्ध लढत होत आहे.

चार सामन्यांत जमशेदपूरने एकही गोल स्विकारलेला नाही. त्यांचे बचावपटू एफसी पुणे सिटीच्या धडाकेबाज स्ट्रायकर्सना रोखणार का याची उत्सुकता असेल.

स्टीव कॉप्पेल यांच्या मार्गदर्शनाखाली जमशेदपूरने अद्याप एकही पराभव पत्करलेला नाही. इंग्लंडच्या कॉप्पेल यांना पुण्याच्या आक्रमणातील धोक्याची मात्र जाणीव आहे.

ते म्हणाले की, पुण्याचा संघ टॉप आहे असे म्हणणे उचित ठरेल. लिगमधील दोन सर्वोत्तम स्ट्रायकर्स त्यांच्याकडे आहेत. मार्सेलिनो आणि एमिलीयाना अल्फारो या दोघांनी गेल्या वर्षी चांगला खेळ केला. त्यांची जोडी भेदक आहे. हा सामना अवघड असेल, पण तो पाहताना प्रत्येकाला आनंद वाटेल.

बचावपटू अनास एडाथोडीका काही सामने खेळू शकणार नाही. केरळा ब्लास्टर्सविरुद्ध त्याला दुखापत झाली. तो फिजीओथेरपी करून घेत आहे. दुखापत चिघळू नये म्हणून तो संघाबरोबर प्रवास करणे टाळत आहे, अशी माहिती कॉप्पेल यांनी दिली.

सर्वोत्तम बचावपटूच्या गैरहजेरीत कॉप्पेल यांच्या संघासमोरील आव्हान वाढले आहे. पुण्याने चार सामन्यांत आठ गोल नोंदविले आहेत, मात्र जमशेदपूरविरुद्ध गोल नोंदविणे सोपे नसेल हे पुण्याचे प्रशिक्षक रँको पोपोविच यांनी मान्य केले.

सर्बियाच्या पोपोविच यांनी जमशेदपूरच्या बचावाचे कौतूक केले. ते म्हणाले की, बचावाच्या बाबतीत हा संघ सर्वाधिक संघटित आहे. त्यांनी अद्याप एकही गोल पत्करलेला नाही. त्यामुळे आम्हाला सुद्धा गोल करणे सोपे नसेल. हेच आमच्यासमोर आव्हान असेल. त्यामुळे या सामन्यासाठी मी आतूर झालो आहे.

मागील सामन्याच्यावेळी जमशेदपूरचे मैदान काळजीचा विषय ठरला होता. त्याविषयी पोपोविच म्हणाले की, हे काही कारण असू शकत नाही. आम्हाला प्राप्त परिस्थितीत सामना खेळावा लागेल. मैदानाची अवस्था सुधारली असेल अशी आशा आहे.

हा सामना बाहेरील मैदानावर असणे संघाच्या फायद्याचे नसेल का, या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, आमच्याप्रमाणेच जमशेदपूरला सुद्धा बाहेरील मैदानांवर खेळावे लागेल. आम्हाला ही सबब पुढे करता येणार नाही. जमशेदपूरमध्ये भारतातील सर्वोत्तम अॅकॅडमी आहे. येथील लोक फुटबॉलवर प्रेम करतात.