भारताच्या दोन दिग्गज फुटबॉलपटूंकडून सुनील छेत्रीचा सन्मान

मुंबई। सोमवारी इंटरकॉन्टीनेंटल कप 2018 फुटबॉल स्पर्धेत पार पडलेल्या भारत विरुद्ध केनिया सामन्यात भारताने 3-0 ने विजय मिळवला. हा सामना भारताचा कर्णधार सुनील छेत्रीचा 100 वा आंतरराष्ट्रीय सामना होता.

याबद्दल छेत्रीचा विशेष सन्मान करण्यात आला. हा सन्मान भारताचे माजी महान फुटबॉलपटू आयएम विजयन आणि माजी महान कर्णधार बायचुंग भुतिया यांच्या हस्ते करण्यात आला. छेत्रीला 100 आकडा असलेली चांदीची प्रतिकृती भेट देण्यात आली.

विजयन आणि भुतिया या दोघांनीही छेत्रीचे कौतुक आणि अभिनंदन केले.  तसेच भुतियाने 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या खेळाडूंच्या क्लबमध्ये छेत्रीचे स्वागत केले.

छेत्री हा 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा बायचुंग भुतिया नंतरचा दुसराच भारतीय फुटबॉलपटू ठरला आहे.

तसेच सामन्याआधी भारतीय संघाने छेत्रीला गार्ड ऑफ ऑनर देऊन त्याच्याबद्द्ल आदर व्यक्त केला.

छेत्रीने दोन दिवसापूर्वीच भारतीय चाहत्यांना फुटबॉलचे सामने स्टेडियममध्ये येऊन बघण्याचे आवाहन केले होते. त्याच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत चाहत्यांनी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.

छेत्रीनेही चाहत्यांना नाराज न करता २ गोल करून भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली. त्याचे आता आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये ६१ गोल झाले आहेत.

सामना संपल्यानंतर कर्णधार छेत्रीने चाहत्यांचे आभार मानले.

भारताचा या स्पर्धेतील पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध ७ जूनला होणार आहे. या स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत दोन सामने जिंकले आहेत. भारताने १ जूनला झालेल्या सलामीच्या सामन्यात चायनीज तिपेईला 5-0 असे पराभूत केले होते.