प्रो कबड्डी: अनुप कुमारपेक्षा सरस ठरेल दिपक हुडा!

पुणे: प्रो कबड्डी लीगमधील पुणेरी पलटण संघाच्या जर्शीचे आज पुणे येथे अनावरण झाले. याप्रसंगी पुणेरी पलटणचा कर्णधार दीपक हुडा, प्रशिक्षक बी.सी. रमेश, संघाचे सीईओ कैलाश कंदपल आणि फोर्स मोटर्सचे अशोक खोसला उपस्थित होते.

संघाच्या तयारीबद्दल आणि कर्णधाराबद्दल भाष्य करताना बी.सी. रमेश यांनी कर्णधार म्हणून अनुप कुमारपेक्षा पुणेरी पलटणचा कर्णधार दीपक हुडा सरस ठरेल हा विश्वास व्यक्त केला.

पुणेरी पलटणचे प्रशिक्षक बी.सी.रमेश म्हणाले, ” संघाची तयारी जोरदार चाललेली आहे. विविध परिस्थितीत खेळण्याचा सराव आम्ही करत आहोत. ‘व्हिडिओ विश्लेषण करून इतर संघाविरुद्ध रणनीती आखण्यात येत आहेत. यावेळचे पर्व मोठे असणार आहे त्यामुळे खेळाडूंच्या शारीरिक तंदुरुस्तुवरही भर देण्यात येत आहे.

नवखा दिपक कर्णधाराची भूमिका कसा बजावेल यावर भाष्य करतांना बी.सी.रमेश म्हणाले, “दिपक हा अतिशय गुणी खेळाडू आहे.त्याला मी पहिल्यांदा २०१४ साली ‘झारखंड’ कडून खेळतांना बघितले. तेव्हाच त्याच्यात एक उत्कृष्ट ‘अष्टपैलू’ होण्याचे टॅलेंट आहे हे मला वाटले होते.त्यामुळे पुण्यासाठी तो एक योग्य कर्णधार आहे.इतकेच नाही तर या पर्वात तो कर्णधार म्हणून अनुप कुमारपेक्षाही सरस ठरेल”

संघाच्या समतोलबद्दल बोलताना ते म्हणाले,
“आमच्याकडे चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत जे विविध ‘पोजिशन्स’ला खेळू शकतात.दिपक, संदीप हे महत्त्वाचे अष्टपैलू खेळाडू आहेत.धर्मराज चेरलाथनच्या रूपात कुठल्याही जागेवर खेळू शकणारा खेळाडू आमच्याकडे आहे”

तर घोडा मैदान लांब नाही त्यामुळे मैदानात अनुप सरस ठरतो की दिपक हे कळेलच,बी.सी.रमेश यांनी मात्र असे विधान करून ‘पुणे विरुद्ध मुंबई’ युद्धाचे रणशिंगच जणू फुंकले आहे! आता यावर अनुप आणि यू मुम्बा काय प्रतिक्रिया देते हे पाहणे मोठे रंजक ठरेल!

– शारंग ढोमसे( टीम महा स्पोर्ट्स )