अखेर प्रतिभावान पृथ्वी शॉने विक्रमवीर कोहलीचा विक्रम मोडलाच

१९ वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार असलेला पृथ्वी शॉने देशांतर्गत क्रिकेटप्रमाणेच १९ वर्षांखालील विश्वचषकातही उत्तम कामगिरी केलेली आहे. या कामगिरीमुळे त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आज त्याने न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीचा एक खास विक्रम मोडला आहे.

पृथ्वी १९ वर्षांखालील विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने सध्या सुरु असलेल्या विश्वचषकात सहा सामन्यात खेळताना २६१ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ अर्धशतकांचाही समावेश आहे. या आधी हे विक्रम विराट कोहली आणि उन्मुक्त चंद यांच्या नावावर होते.

पृथ्वीला आज १९ वर्षांखालील विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्यासाठी फक्त १४ धावांची गरज होती आणि विराटचा विक्रम मोडण्यासाठी ३ धावांची गरज होती.

२००८ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात विराटने २३५ धावा केल्या होत्या. तर २०१२ मध्ये उन्मुक्त चंदने २४६ धावा करत विराटचा हा विक्रम मागे टाकला होता. या दोघांनीही सहा सामने खेळले होते. विशेष म्हणजे या दोघांच्याही नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे आता पृथ्वी शॉच्या टीम इंडियाकडूनही अशीच अपेक्षा सर्वांना आहे.

आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाचा १९ वर्षांखालील विश्वचषकाचा अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात हा विक्रम केल्यानंतर लगेचच २९ धावांवर असताना पृथ्वीने आपली विकेट गमावली आहे. चौथा विश्वचषक जिंकण्यासाठी भारतासमोर २१७ धावांचे आव्हान आहे.