कुलदीप यादवला विराटकडून मिळाली अशी शाबासकी !

पल्लेकेल: येथे सुरू असलेल्या श्रीलंका आणि भारत विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने वर्चस्व मिळवले आहे. ४८६ धावांचा डोंगर उभारल्या नंतर भारताने श्रीलंकेला १३५ धावत गुंडाळले आहे. भारताकडे ३५२ धावांची मोठी आघाडी आहे. मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले तर युवा गोलंदाज कुपलीप यादवने चमकदार कामगिरी करत ४ मोहरे टिपले.

गेले आठवडाभर या गोलंदाजाला तिसऱ्या कसोटीमध्ये संधी मिळणार किंवा नाही याबद्दल चर्चा सुरु होती. परंतु परवा या खेळाडूला तिसऱ्या कसोटीमध्ये संधी देण्याचे स्पष्ट संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले होते. त्याप्रमाणे कुलदीप कसोटी कारकिर्दीतील दुसरा कसोटी सामना खेळत आहे.

परंतु आज चमकदार कामगिरी करणाऱ्या या खेळाडूला कर्णधार विराट कोहलीकडून एक खास बक्षिस मिळाले. जेव्हा संघ चांगली कामगिरी करतो त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जाताना शक्यतो कर्णधार हा मैदानावरून सर्वात पुढे चालतो आणि बाकी संघ त्यापाठीमागे येत असतो.

काही वेळा त्या सामन्यात चमकदार कामगिरी करणारा खेळाडू हा पुढे आणि बाकी संघ मागे जातो. परंतु आज विराट कोहलीने सीमारेषेवर कुलदीप यादवची वाट पाहत त्याला पुढे चालण्यासाठी विचारले. २२ वर्षीय कुलदीप यादवसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. तसेच या युवा खेळाडूचा आत्मविश्वास वाढवणारी तसेच आंतरराष्ट्रीय स्थरावर चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे.