कार थेट मैदानात, दिल्ली वि. उत्तर प्रदेश रणजी सामन्यात घडली घटना !

दिल्ली। आज दिल्ली विरुद्ध उत्तर प्रदेश संघात चालू असलेल्या रणजी सामन्यात एक राखाडी रंगाची वॅगनआर कार मैदानात आली आणि त्यामुळे सामना थांबवावा लागला.

लांब केसाचा आणि लाल कुर्ता घातलेला एक व्यक्ती ही कार चालवत होता. त्याने जेव्हा कार मैदानात आणली तेव्हा अंपायर तिसरा दिवसाचा खेळ संपवण्याच्या दृष्टीने मैदानातील सूर्यप्रकाश तपासत होते.

हा माणूस मल्टिनॅशनल कंपनीत कर्मचारी आहे. तो म्हणाला गेटवर कोणतीही सुरक्षा नव्हती. याबद्दल एअर फोर्स तपास करत आहे. या कारमुळे खेळपट्टीचे कोणतेही नुकसान झाले नाही.

ESPNCricinfo मधील रिपोर्टप्रमाणे त्या व्यक्तीचे नाव गिरीश शर्मा असे असून त्याने आपण रस्ता विसरल्याने सांगितले आहे. तसेच मैदानात येताना आपल्याला कुणीही न आडवल्याचे सांगितले आहे. त्या व्यक्तीने दोन वेळा खेळपट्टीवरून गाडी चालवली. त्याला पंच आणि खेळाडूंनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व व्यर्थ गेले.

खेळ संपायला २० मिनिटे बाकी असताना हा प्रकार घडला. त्यावेळी पंचांनी खेळपट्टीचा निरीक्षण करून पुन्हा खेळ सुरु केला. त्यामुळे दिवसाचा खेळ पुन्हा २०मिनिटे लांबवण्यात आला.

या सामन्यात सुरेश रैना, इशांत शर्मा, गौतम गंभीर, उन्मुक्त चंद आणि रिषभ पंत सारखे भारतीय संघाबाहेर असलेले मोठे खेळाडू खेळत आहेत. इशांत शर्माने दोन्ही डावात चमक दाखवताना प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या आहेत तर गौतम गंभीरने पहिल्या डावात ८६ धावा केल्या आहेत. सुरेश रैना दोन्ही डावात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे.

तत्पूर्वी दिल्ली विरुद्ध उत्तरप्रदेश सामन्यात उत्तरप्रदेश संघाने २४६ धावांची आघाडी घेतली असून सामन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.