दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनल: या मोठ्या बॅडमिंटनपटूची माघार

या महिन्यात १३ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनल स्पर्धेतून स्पेनच्या कॅरोलिना मारिन आणि जपानच्या नोझोमी ओकुहरा या दोन मोठ्या बॅडमिंटनपटूंनी महिला एकेरीतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे.

२०१६ रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती कॅरोलिनाने ट्विटरवरून आपण माघार घेत असल्याचे सांगितले आहे. ती ट्विट मध्ये म्हणाली आहे की ” दुखापतीमुळे मी दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनलमध्ये सहभागी होऊ शकत नाही. परंतु मी लवकर पुनरागमन करेल.”

जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणारी कॅरोलिना यावर्षी ४ सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. यातील इंडिया, मलेशिया आणि सिंगापूर सुपर सिरीजमध्ये तिला उपविजेतेपद मिळाले होते. तर जपान ओपन सुपर सिरीजमध्ये तिने विजेतेपद मिळवले होते.

आता तिच्या ऐवजी या स्पर्धेत जपानच्या सायको साटोचा समावेश केला आहे.

याबरोबरच जागतिक क्रमवारीत ७ व्या क्रमांकावर असणाऱ्या ओकुहराने गुडघा दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. याबद्दल जपानचे प्रशिक्षक पार्क जू -बॉन्ग यांनी सांगितले. ते म्हणाले, ती दुखापतीतून अजूनही पूर्णपणे सावरली नसल्याने ती या स्पर्धेत सहभागी होणार नाही. ” जर तिने या स्पर्धेत सहभागी होऊन माघार घेतली असती तर हे खूप गैरसोयीचे झाले असते.”

ओकुहराला सप्टेंबर महिन्यात झालेल्या जपान ओपन सुपर सिरीज दरम्यान ही दुखापत झाली होती. तिने या वर्षी ग्लासगो येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पिअनशिप स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूला हरवून विजेतेपद मिळवले होते. तसेच तिने २०१६ रिओ ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक मिळवले आहे.

भारताकडून दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनल स्पर्धेत पीव्ही सिंधू आणि किदांबी श्रीकांत सहभागी होणार आहेत.

या सुपर सिरीजमध्ये बीडब्ल्यूएफच्या क्रमवारीत प्रथम आठ खेळाडूंना संधी मिळते, त्यामुळे सायना नेहवाल आणि एच एस प्रणॉय या स्पर्धेस पात्र ठरू शकले नाहीत.