राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत सेन्ट्रल रेल्वे, सेंट्रल बँक यांची विजयी सलामी.

गांवदेवी क्रीडा व युवक मंडळ भातसई यांचा मंडळाचा सुवर्ण महोस्तवी वर्ष असून कै. शांताराम मा. कोतवाल क्रीडा नगरीत दिनांक ७ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या कालावधी मध्ये राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने गांवदेवी क्रीडा व युवक मंडळ, भातसाई आयोजित राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेला काल सुरुवात झाली.

कोल्हापूर येथे ३ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत व्यावसायिक कबड्डी स्पर्धा झाली. आणि कालपासून लगेच दुसरी व्यावसायिक स्पर्धा भातसई येथे सुरू झाल्यामुळे काही संघ काल स्पर्धेला उपस्थितीत राहू शकले नाहीत. त्यामुळे पहिल्यादिवशी ५ साखळी सामने झाले.

बालाजी प्रतिष्ठान पुणे विरुद्ध नेव्हल डॉकयार्ड मुंबई यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात बालाजी प्रतिष्ठान पुणे संघाने ४५-२६ असा सहज विजय मिळवला. तर सामन्यात चव्हाण इंडस्ट्री सोलापूरने रिसर्व्ह बँक संघावर ४६-३१ असा विजय मिळवला.

सेंट्रल रेल्वे विरुद्ध विनोद कन्स्ट्रक्शन रोहा यांच्यात तिसरा सामना झाला. विनोद कन्स्ट्रक्शन हा रोह्यातील स्थानीक व्यावसायिक संघ आहे. सेंट्रल रेल्वे संघ अनुभवी व बलाढ्य होता. सेन्ट्रल रेल्वे संघाने ३६-२३ असा विजय मिळवत विजयी सलामी दिली. बालाजी प्रतिष्ठान विरुद्ध सेंट्रल बँक याच्यात झालेल्या लढतीत सेंट्रल बँक संघाने ३९-२६ असा विजय मिळवला.

चव्हाण उद्योग सोलापूर विरुद्ध रायगड पोलीस यांच्यात चुरशीचा सामना बघायला मिळाला. रायगड पोलीस संघाला संघर्ष करावा लागला. चव्हाण उद्योग सोलापूर संघाने ४४-४० असा दुसरा विजय मिळवत बादफेरीतील आपला स्थान जवळपास निश्चित केला आहे. रायगड पोलीस संघाला रिझर्व्ह बँकवर विजय मिळवला तरी महिंद्रा अँड महिंद्रा संघाचे कडवे आव्हान आहे.