रोहितची चौकार षटकारांची बरसात, आंतरराष्ट्रीय टी २० मधील सर्वात जलद शतक करण्याच्या डेव्हिड मिलरच्या विक्रमाशी बरोबरी

इंदोर। आज होळकर क्रिकेट स्टेडिअमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसऱ्या टी २० सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने चौकार षटकारांची बरसात करत आपले शतक पूर्ण केले आहे. रोहितचे हे आंतरराष्ट्रीय टी २० मधील दुसरे शतक आहे.

याबरोबरच रोहितने आंतरराष्ट्रीय टी २० मधील सर्वात जलद शतक करण्याच्या डेव्हिड मिलरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रोहितने ३५ चेंडूंतच हे शतक पूर्ण केले. त्याने आज ४३ चेंडूत ११८ धावांच्या खेळीत १२ चौकार आणि १० षटकार ठोकले. त्याला दुशमंथा चमिराने बाद केले. 

रोहितने आज सुरवातीपासूनच आक्रमक खेळायला सुरुवात केली होती त्याच्या जोडीला सलामीला आलेला के एल राहुलही आक्रमक खेळत होता परंतु रोहितच्या अशा आक्रमक अंदाजामुळे त्याला प्रेक्षकांची भूमिका निभवावी लागली.

रोहितने परवा झालेल्या पहिल्या टी २० सामन्यामध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय टी २० कारकिर्दीतील १५०० धावा पूर्ण केल्या होत्या. असे करणारा तो विराट कोहली नंतरचा दुसराच भारतीय ठरला होता.