Premier League: चेल्सी, अर्सेनल आणि मॅन्चेस्टर संघांचा विजय

प्रिमियर लीगचा गेम वीक २४ चे जवळजवळ सर्व सामने काल पार पडले. चेल्सी, मॅन्चेस्टर युनाएटेड, अर्सेनल, मॅन्चेस्टर सिटी या प्रमुख संघांनी काल अपल्या सामन्यात विजय मिळवले. कालच्या सामन्यांनंतर गुणतालीकेत प्रत्येक संघाने आपले स्थान कायम ठेवले आहे.

चेल्सीने मोराटाला आराम देत सामन्याला सुरुवात केली आणि हजार्डने चेल्सीला त्याची कमतरता जाणवू दिली नाही तिसर्याच मिनिटाला गोल करत सामन्यात ०-१ ने आघाडी घेतली.

अवघ्या ३ मिनिटानंतर विलियनने गोल करत सहाव्या मिनिटालाच ब्रिघटाॅनवर ०-२ ची बढत मिळवून देत सामन्यावर मजबूत पकड मिळवली. पहिल्या हाफच्या शेवट पर्यंत ही आघाडी अशीच ठेवण्यात चेल्सीला यश मिळाले.

दुसऱ्या हाफ मध्ये विलियनच्या असिस्टवर हजार्डने सामन्यातील आपला दुसरा गोल केला आणि चेल्सीला ३ गोल्सची आघाडी मिळवून दिली. मोसेसने नोव्हेंबर २०१६ नंतरचा आपला पहिला गोल केला त्याबरोबरच सामन्यात ०-४ ने विजयी बढत घेतली. चेल्सीचा २०१८ चा हा पहिला विजय होता सलग ५ सामने बरोबरीत सुटल्यानंतर या सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले.

दूसरीकडे या मौसमातील पहिला सामना गमावणाऱ्या मॅन्चेस्टर सिटीचा सामना न्यू कॅसल बरोबर झाला. लिवरपुलकडून मिळालेल्या पराभवाच्या धक्क्यातून सिटी बाहेर पडते का यावर सगळ्यांचे लक्ष होते.

पहिला हाफ गोलविरहितच जाणार असे दिसत असताना सिटीकडून सर्वाधिक गोल्स करणाऱ्या ॲगुवारोने ३४ व्या मिनिटाला डी ब्रूनेच्या अप्रतिम क्राॅसवर हेडरने गोल केला. बाॅल ॲगुवारोच्या केसांना लागून गेल्याने गोल ॲगुवारोच्या खात्यात जमा झाला.

दुसऱ्या हाफच्या ६२ व्या मिनिटाला स्टर्लिंगला पेनल्टी बाॅक्स मध्ये पाडल्याने सिटीला पेनल्टी मिळाली. ॲगुवारोने घेतलेली पेनल्टी कीक गोलकीपरचा हाताला लागली पण त्याला अडवण्यात यश मिळाले नाही. ६७ व्या मिनिटला लांब पासवर न्यूकॅसलने एडरसनला चकवत पहिला गोल केला आणि सिटीवर पुन्हा एकदा दबाव आणला.

सामना शेवटच्या १० मिनिटात पोहचला असताना सिटीने परत एकदा गोल करत सामना ३-१ ने खिशात घालत ३ महत्वपूर्ण गुण मिळवले. ॲगुवारोने तिसरा गोल करत हॅटट्रिक घेतली. ॲगुवारोची ही मॅन्चेस्टर सिटी कडून ११ वी हॅटट्रिक होती.

अर्सेनलने पहिल्या २२ मिनिटातच ४ गोल करत सामनाचा निकाल आपल्या बाजूने लागेल यावर शिक्कामोर्तब केला. क्रिस्टल पॅलेसचा त्यांनी ४-१ ने पराभव केला. तर बर्नलेचा मॅन्चेस्टर युनाएटेडने ०-१ असा पराभव केला. सामन्यातील एकमेव गोल मार्शलने लुकाकुच्या असिस्टवर केला.

प्रीमियर लीगमध्ये आज साउथ्यॅम्पटन वि. टोट्टेन्हम तर स्वान्सी वि. लिवरपुल चे सामने आहेत.