राष्ट्रीय अॅथलेटीक्स: चेन्नईच्या विद्यार्थ्यांची पहिल्या दिवशी चमक

मुंबई: पतियाळाचा मानवीर कौर आणि हैदराबादचा अमलन बोर्गोहैन यांनी रिलायन फौंडेशन युथ स्पोर्टसच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुवर्णपदक जिंकले. कांदीवली येथील साईच्या (स्पोर्टस अॅथॉरिटी ऑफ इंडिया) ट्रॅकवर ही स्पर्धा सुरु झाली.

या दोघांनी आपापल्या शहराच्या टप्यांतील कामगिरी उंचावली. पतियाळामधील नॅशनल कॉलेज ऑफ फिजीकल एज्यूकेशनची विद्यार्थिनी असलेल्या मानवीर कौरने 12 ः13 सेकंद वेळ नोंदविली. तिने शहराच्या टप्यातील 12ः26 सेकंद वेळेचा उच्चांक मागे टाकला. याचप्रमाणे हैदराबादच्या अविनाश कॉलेजच्या अमलन याने 10ः84 सेकंद वेळ नोंदविताना 10ः88 उच्चांक मागे टाकला.

पहिल्या दिवसी चेन्नईच्या विद्यार्थ्यांनी सहा सुवर्ण, पाच रौप्य व पाच ब्राँझ अशी 16 पदकांची लयलूट केली. बेंगळुरूच्या स्पर्धकांकडून बऱ्याच अपेक्षा होत्या, पण त्यांना केवळ तीन सुवर्ण व तीन रौप्य मिळविता आली, तर लखनौने तीन सुवर्ण व तेवढ्याच रौप्यपदकांसह अनपेक्षित कामगिरी नोंदविली.