इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग: चेन्नई चॅलेंजर्सचा दिलेर दिल्लीवर ३७-३६ असा विजय, चेन्नई तिस-या स्थानी

बंगळूरु। सुनिल कुमार (13 गुण) व एलायाराजा (9 गुण) यांनी केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत चेन्नई चॅलेंजर्स संघाने दिलेर दिल्ली संघावर 37-36 असा विजय मिळवला व तिसरे स्थान पटकावले.

बंगळूरु येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत चेन्नई चॅलेंजर्स व दिलेर दिल्ली संघांमध्ये चांगली चुरस पहायला मिळाली. दोन्ही संघांमध्ये गुण मिळवण्यासाठी चढाओढ पाहण्यास मिळत होती. पण, चेन्नई चॅलेंजर्सच्या सुनिल कुमार व एलायाराजा यांनी चमक दाखवत पहिले क्वॉर्टर 10-6 असे आपल्या नावे केले. दुस-या क्वॉर्टरमध्ये दिलेर दिल्ली संघाच्या सुनिल जयपालने गुणांची कमाई केली. त्याला हरदीप चिल्लरने चांगली साथ दिली. त्यामुळे दुसरे क्वॉर्टर दिलेर दिल्ली संघाने 10-7 असे आपल्या नावे केले. पण, मध्यंतरापर्यंत चेन्नई चॅलेंजर्स संघाकडे 17-16 अशी एका गुणाची आघाडी होती.

तिस-या क्वॉर्टरमध्ये चेन्नई चॅलेंजर्स संघाने चांगला खेळ केला. पण, दिल्लीच्या संघाने पुनरागमन करत गुणांची कमाई केली व तिसरे क्वॉर्टर 11-8 असे आपल्या नावे करत सामन्यात 28-24 अशी आघाडी मिळवली. त्यामुळे शेवटच्या क्वॉर्टरमध्ये चांगली चुरस पहायला मिळाली. दिल्ली व चेन्नई यामधील अंतर केवळ चार गुणांचे होते. अखेरच्या क्वॉर्टरमध्ये दिल्लीच्या संघाने जोर लावला. शेवटचे क्वॉर्टर दिलेर दिल्लीने 12-9 असे आपल्या नावे केले पण, सामना चेन्नईने जिंकला.