इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग- चेन्नई चॅलेंजर्सचा तेलुगु बुल्सवर 33-32 असा विजय

पुणे । इलायाराजाच्या आक्रमक चढाया तर, राजेश धिमानच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इंडो इंटरनॅशनल कबड्डी लीग स्पर्धेत चेन्नई चॅलेंजर्स संघाने पिछाडीवरुन जोरदार कामगिरी करत तेलुगु बुल्स संघावर 33-32 असा अवघ्या एका गुणाने विजय मिळवला. सुरुवातीच्या तीन क्वॉर्टरमध्ये पिछाडीवर असून देखील चेन्नईच्या खेळाडूने शेवटच्या क्वॉर्टरमध्ये जोर लावत विजय साकारला.

पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम येथे सुरु असलेल्या या सामन्यात तेलुगु बुल्स व चेन्नई चॅलेंजर्स या दोन्ही दाक्षिणात्य संघांमध्ये चांगली चुरस ही पहायला मिळाली. तेलुगु बुल्स संघाकडून अभिनंदन कुमारचे चढाईत चमक दाखवत पहिल्या क्वॉर्टरमध्ये संघाला 10-7 अशी आघाडी मिळवून दिली. दुस-या क्वॉर्टरमध्ये चेन्नई संघाने तेलुगु संघावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला पण, जीवाने बचावफळीत चमक दाखवत तेलुगु संघाने दुसरे क्वॉर्टर 9-7 असे आपल्या नावे करत मध्यंतरापर्यंत 19-14 अशी आघाडी घेतली.

तिस-या क्वॉर्टरमध्ये चेन्नईच्या संघाने इलायाराजाने चढाईत चमक दाखवत गुणांची कमाई केली. पण, जीवाने बचावात पुन्हा चांगली कामगिरी करत तिसरे क्वॉर्टर 8-7 असे आपल्या नावे केले. शेवटच्या क्वॉर्टरमध्ये चेन्नईच्या संघाचे आघाडी कमी करण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले. या क्वॉर्टरमध्ये राजेश धिमानने अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या गुणसंख्येत भर घातली. एक वेळ पिछाडीवर असलेल्या चेन्नईच्या संघाने त्यामुळे आघाडी घेत क्वॉर्टर 12-5 असे आपल्या नावे करत सामन्यात 33-32 असा अवघ्या एका गुणाने विजय मिळवला.

शुक्रवारचे सामने :
– पुणे प्राईड वि.पाँडीचेरी प्रिडेटर्स (21 वा सामना ) (8 -9 वाजता)
– हरयाणा हिरोज वि.बंगळूरु रायनोज (22 वा सामना ) (9-10 वाजता)
– दिलेर दिल्ली वि.तेलुगु बुल्स (23 वा सामना ) (10-11 वाजता)