“छत्रपती शिवाजी महाराज चषक” कबड्डी स्पर्धेत महिला खेळाडूने मोडला प्रदीप नरवालचा रेकॉर्ड

सांगली: इस्लामपूर सांगली येथे सुरू असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज चषक” कबड्डी स्पर्धेत काल (२१ डिसेंबर) रोजी झालेल्या पुणे विरुद्ध सातारा महिला गटाच्या साखळी सामन्यात महिला खेळाडूने प्रदीप नरवालचा विक्रम मोडीत काढत नवीन विक्रम प्रस्थापित केला.

सातारा जिल्ह्याची चढाईटपटू सोनाली हेळवी हिने पुणे विरुद्ध झालेल्या साखळी सामन्यांत तब्बल ३६ गुणांची कमाई करत नवीन विक्रम केला. प्रो कबड्डी प्रदीप नारवालच्या नावावर एका सामन्यात ३४ गुण होते. पण बलाढ्य पुणे संघाविरुद्ध सोनालीने चढाईत २६ गुण व १० बोनस गुण मिळवले. सोनाली हेलवीने पुणे विरुद्ध एकाकी झुंज दिली. पण पुणे संघाने ५९-५४ असा सामना जिंकला.

 

 

 

 

 

 

 

आक्रमक, चपळ असा खेळ असणारी सोनाली हेळवी बोनस करण्यात पारंगत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत दिवसातील उत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून सोनाली हेळवीला रोख रुपये १०,००० बक्षीस मिळाले.

सातारा जिल्ह्याची हुकमी खेळाडू व कर्णधार असलेली सोनाली हेळवी ह्या महिला खेळाडूने किशोरी गट, कुमारी गट, शालेय, विद्यापीठ, खेलो इंडिया अश्या सर्व स्पर्धा मिळून एकूण १२ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत खेळली असून तसेच महाराष्ट्र संघाचे कर्णधार पद ही भूषवले आहे.