मराठवाडयातील भाचेमंडळींची पुण्यात क्रीडा सफर…

टेनिसच्या मैदानापासून ते स्विमिंग पूल आणि फ़ुटबाँलच्या मैदानापासून ते शूटिंगच्या रेंजपर्यंत मराठवाड्यातील वंचित मुलांना काल आंघोळीच्या गोळी या संस्थेने आयोजित केलेल्या चला मामाच्या गावाला जाऊया या उपक्रमात अनुभवायला मिळालं.

आंघोळीची गोळी संस्थेने सलग दुसऱ्या वर्षी चला मामाच्या गावाला जाऊया हा उपक्रम आयोजित केला आहे. त्यात प्रामुख्याने मराठवाड्यातील दुष्काळी भागातील अनाथ, गरीब आणि शेतकऱ्यांची मुले पुण्यात आणून त्यांना वेगवेगळी ठिकाणे दाखवणे, समाजातील मोठ्या व्यक्तींबरोबर संवाद साधने, ऐतिहासिक वस्तूंना भेट देणे तसेच खेळाची मैदाने तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूं यांची भेट घडवणे असे उपक्रम राबवले जातात.

जाणून घेतलं क्रीडाग्राम
काल या मुलांनी क्रीडा दिवस साजरा करताना सकाळी शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथे विविध खेळाच्या मैदानांना भेट दिली. तसेच क्रीडाग्राम म्हणजे नक्की काय असत हे समजावून घेतलं. त्यावेळी या मुलांना सराव करत असलेल्या नवोदित खेळाडूंना भेटायची आणि त्यांचा सराव पाहायची संधी मिळाली.

भेट क्रिकेट संग्रहालयाला
दुपारी ह्या भाचे कंपनीने सणस मैदान पुणे येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याचा आनंद घेतला. जगात क्रिकेटच संग्रहालय म्हणून प्रसिद्ध असलेल्या ब्लेड्स ऑफ ग्लोरीला या चिमुकल्यांनी दुपारी भेट दिली. त्यावेळी सचिन, विराट, धोनी यांच्या विक्रमी बॅट त्यांना पाहता आल्या. तसेच अनेक परदेशी खेळाडूंचे ग्लोव्हस, बॅट, टी शर्ट्स पाहता आले.

गप्पा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरींशी
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरींशी संवाद साधने ही तर या भाच्यांसाठी पर्वणीच ठरली. विजयनेही दिलखुलासपणे भाच्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रेरणा मिळणं हा उद्देश
या बद्दल बोलताना आंघोळीची गोळी संस्थेचे प्रमुख आणि मामाच्या गावाला जाऊया उपक्रमाचे आयोजक माधव पाटील म्हणाले, ” ह्या उपक्रमाचं हे दुसरं वर्ष आहे. आम्ही या सर्व भाच्यांना या उपक्रमाद्वारे एक स्वप्न, भविष्य दाखवत आहोत. जेणेकरून त्यांनी कुठेतरी प्रेरणा घेऊन एक मोठे व्यक्ती बनावे. समाजाला पुढे घेऊन जावे. या क्रीडा सफरमुळे त्यांना क्रीडाक्षेत्र काय असत हे कळेल. याचा उपयोग ते स्वतःसाठी किंवा इतर या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या त्यांच्या मित्रांना करू शकतात.”
यावेळी या संस्थेचे अमोल बोरसे, ह्रिषीकेश आढाव, रुपाली पाटील, विकास उगले, विशाखा भालेराव आणि धनश्री कुंभार उपस्थित होते.