गेलचा पुन्हा एकदा धमाका, केले हे ५ खास विश्वविक्रम !

आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या विंडीजच्या ख्रिस गेलने आज बांग्लादेश प्रिमियर लीगच्या अंतिम सामन्यात रंगपूर रायडर्सकडून खेळताना धडाकेबाज शतक केले आहे. याचबरोबर त्याने विश्वविक्रमही रचले आहेत.

गेलने धडाकेबाज शतकी खेळी करताना ६९ चेंडूत नाबाद १४६ धावा केल्या आहेत. त्याने या खेळीत तब्बल १८ षटकार आणि ५ चौकार मारले आहेत. टी २० क्रिकेटमधील हे त्याचे २० वे शतक आहे.

त्याच्या साथीला खेळणाऱ्या ब्रेंडन मॅक्क्युलमने देखील अर्धशतक केले आहे. या दोघांनी मिळून नाबाद २०१ धावांची भागीदारी रचली. याच जोरावर रंगपूर रायडर्स संघाने ढाका डायनामाईट्स विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना १ बाद २०६ धावा केल्या आहेत.

ब्रेंडन मॅक्क्युलमने ४३ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या. या खेळीत त्याने गेलची साथ देताना ४ चौकार आणि ३ षटकार मारले आहेत.

या सामन्यात ख्रिस गेलने केलेले विश्वविक्रम

– एकाच डावात १८ षटकार मारणारा पहिला खेळाडू

– टी २० क्रिकेट प्रकारात २० शतके पूर्ण करणारा पहिला खेळाडू

– टी २० क्रिकेट प्रकारात ११००० धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू

या सामन्यात आणखी झालेले विक्रम

– बांग्लादेश प्रिमियर लीगमध्ये १०० षटकार पूर्ण करणारा गेल हा पहिला खेळाडू, अजून एकही खेळाडूला ५० षटकारही पूर्ण करता आलेले नाहीत.

– गेलने केली टी २० च्या अंतिम सामन्यातील ही सर्वोच्च खेळी. (नाबाद १४६ धावा)

– गेल आणि मॅक्क्युलमची टी २० च्या अंतिम सामन्यातील सर्वोच्च भागीदारी. (२०१ धावांची नाबाद भागीदारी)

– एकाच डावात १० किंवा त्यापेक्षा जास्तवेळा षटकार मारण्याची गेलची ही १५ वी वेळ