आशियाई जुनियर स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अर्णव सरिनला रौप्यपदक

पुणे:  चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या 25व्या आशियाई जुनियर स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत 15 वर्षाखालील मुलांच्या गटात पुण्याच्या अर्णव सरिन याने भारतासाठी अविस्मरनीय  रौप्यपदकाची कमाई केली आहे.

15 वर्षाखालील गटात भारतातील अव्वल खेळाडू, आशियातील  क्र.  2 व जागतिक क्र. 6 असलेल्या अर्णवचा पुना क्लब तर्फे सन्मान करण्यात आला. अर्णव सेंट मेरी हायस्कुल येथे दहाव्या इयत्तेत शिकतो. अर्णव हा पुना क्लब येथे दिपक मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. अर्णवने 2012 साली वयाच्या नवव्या वर्षी स्क्वॅश खेळायला सुरवात केली.

अर्णवने कोलोन जुनियर कप सीजेसी 2018 या स्पर्धेत तिसरा क्रमाक पटकावला. तर ब्रिटीश जुनियर ओपन बीजेओ 2018 स्पर्धेत सहावा क्रमांक पटकावला. 2017 साली  अॅमस्टरडॅम येथे  पार पडलेल्या डच जुनियर ओपन स्पर्धेत अर्णवने भारताचे प्रतिनिधित्व केले. याच वर्षी जॉर्डन येथे पार पडलेल्या आशियाई जुनियर  स्क्वॅश  अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. याच वर्षी अर्णवने 6 राष्ट्रीय विजेतेपदे पटकीवली.

यावेळी बोलताना पुना क्लबचे क्रीडा विभागाचे चेअरमन मनिष मेहेता म्हणाले की,  अर्णव हा अनेक मुलांसाठी आदर्श आहे. तो अत्यंत स्पर्धात्मक खेळाडू आहे. तो एक महत्वकांक्षी व उदयोन्मुख युवा खेळाडू आहे. आम्हाला त्याचा सन्मान करताना आनंद होत आहे.

यावेळी अर्णवचे प्रशिक्षक दिपक मोमीन, पुना क्लबचे सदस्य मनिष मेहेता, शशांक हळबे, माजी लेफ्टनंट कर्नल अशोक सरकार, अर्णवचे पालक व शहरातील अन्य  स्क्वॅश  खेळाडू उपस्थित होते.