औरंगाबादचा सत्यम निकम करणार महाराष्ट्राचे नेतृत्व

उत्तर प्रदेश संघाशी होणार पहिला हॉकी सामना 

औरंगाबाद: औरंगाबादकर असलेला सत्यम निकम  पुरुष ज्युनियर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र हॉकी संघाचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेला रविवारी (17 फेब्रुवारी) आरंभ होणार असून महाराष्ट्र संघाची यातील पहिली लढत उत्तर प्रदेश संघाशी होणार आहे.
 भारतीय खेळ प्राधिकरण (साई) येथे या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. याबाबत संघ जाहीर करताना  हॉकी महाराष्ट्र सचिव मनोज भोरे यांनी सांगितले की, विविध शहरातील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी औरंगाबादच्याच खेळाडूकडे राज्य संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. हॉकी महाराष्ट्रच्या या संघाला शुभेच्छा आहेत.
सत्यमची कामगिरी गेल्या एक वर्षात लयबद्ध राहिली असून त्याने अनेक स्पर्धांत महाराष्ट्र संघाचे उपकर्णधारपद भूषवले आहे. मणिपूर येथे गतवर्षी 2018 मध्ये झालेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत आणि यंदाच्या पुण्यातील खेलो इंडिया स्पर्धेत त्याने महाराष्ट्राचे उपकर्णधारपद भूषवले आहे.
सत्यमसह अमिद खान पठाण हा औरंगाबादचा हॉकीपटुही महाराष्ट्र संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. या 18 जणांच्या संघात सातारा, इस्लामपूर, नांदेड आदी ठिकाणच्या खेळाडूंचा समावेश राहणार आहे.
यजमान महाराष्ट्र संघ क गटात खेळणार असून यात त्याची साखळी फेरीतील लढत गंगपूर- ओडिशा, उत्तरप्रदेश हॉकी, दिल्ली हॉकी आणि हॉकी कर्नाटक संघाशी होणार आहे. हॉकी महाराष्ट्राचा चमू उत्तर प्रदेश संघाशी आपल्या पहिल्या सामन्यात दोन हात करणार आहे. ही लढत रविवारी (17 फेब्रुवारी) दुपारी अडीच वाजता होणार  आहे.
दरम्यान साईचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी महाराष्ट्र संघाची जर्सी सत्यम निकमला एका समारंभात प्रदान केली. यावेळी औरंगाबाद हॉकी संघटनेचे सचिव पंकज भरसाखळे यांची उपस्थिती होती.
18 जणांचा महाराष्ट्र संघ:
रविराज शिंगटे, किरण मोहिते (जिके), सुरज कांबळे, महेश पाटील, सत्यम निकम (कर्णधार), अथर्व कांबळे, सचिन कोल्हेकर, हर्ष परमार, व्यंकटेश केचे (उपकर्णधार), हरीश शिंगडी, धैर्यशील जाधव, प्रज्वल मोहरकर, आमिद खान पठाण, श्रीकांत बोडिगम, अमिल कोल्हेकर, मयूर धनवडे, कृष्णा मुसळे, यश अंगिर. अजित लाक्रा (प्रशिक्षक), एडविन मोती जॉन.
महाराष्ट्राचे साखळी सामने 
17 फेब्रुवारी : उत्तरप्रदेश हॉकी
18 फेब्रुवारी : हॉकी गंगपूर-ओडिशा
20 फेब्रुवारी : दिल्ली हॉकी
21 फेब्रुवारी : हॉकी कर्नाटक