सर्वांनी समान कष्ट केले आहेत, सर्वांना सारखे बक्षीस द्या- राहुल द्रविड

१९ वर्षांखालील भारतीय संघाने शनिवारी, ३ जानेवारीला चौथ्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून सर्वाधिक वेळा हा विश्वचषक जिंकण्याचा इतिहास रचला. त्यांच्या या यशात सुरवातीपासूनच महत्वाचा वाटा उचलला तो प्रशिक्षक राहुल द्रविडने.

त्यामुळे या संघाला, प्रशिक्षकाला आणि सपोर्ट स्टाफला बीसीसीआयने  बक्षीस जाहीर केले आहे. पण या बक्षिसात प्रथमच प्रशिक्षकाला खेळाडूंपेक्षा जास्त बक्षीस घोषित करण्यात आले आहे. यावर राहुल द्रविडने सर्वांनी सारखी मेहेनत घेतली आहे असे सांगत हा बक्षिसांचा भेदभाव नको असे सांगितले आहे.

बीसीसीआयने प्रशिक्षक राहुल द्रविड यांना ५० लाख रुपये, खेळाडूंना प्रत्येकी ३० लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी २० लाख रुपये असे बक्षीस घोषित केले होते. पण या भेदभावामुळे द्रविड नाराज आहे.

द्रविडने सोमवारी जेव्हा संघ भारतात परत आला तेव्हा मीडियाशी संपर्क साधताना सपोर्ट स्टाफचेही कौतुक केले होते. तो म्हणाला होता, ” हे थोडेसे ओशाळवाणे आहे कारण माझ्याकडे खूप जास्त लक्ष वेधलं गेलं. पण खरंच यात सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंचे कष्ट आहेत. मला त्यांची नावे घ्यायची नाहीत पण सपोर्ट स्टाफने खूप कष्ट घेतले आहेत. आम्ही सर्वांनी मिळून या खेळाडूंसाठी चांगले देण्याचा प्रयन्त केला.”

तो पुढे म्हणाला, “आम्ही मागील १४ ते १६ महिन्यापासून जी तयारी करत आहोत तीच माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. याचे पूर्ण नियोजन आणि तयारी ही या विश्वचषकासाठीच नाही तर १९ वर्षांखालील खेळाडूंच्या विकासासाठीही महत्वाची आहे. आमची सांघिक कामगिरी चांगली झाली यात पडद्यामागील लोक, निवडसमिती, एनसीए आणि बीसीसीआय यांनी चांगला पाठिंबा दिला. स्पर्धा जिंकणे ही सांघिक कामगिरीचं दर्शवणारे आहे.”  याबरोबरच पृथ्वी शॉने देखील ट्विटरवरून सपोर्ट स्टाफचे आणि द्रविडचे कौतुक केले होते.

द्रविड हा नेहेमीच त्याच्या शांत आणि आदर्शवत स्वभावासाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याचे सर्वच कौतुक करत असतात. त्याने या विश्वचषकातही मार्गदर्शन करताना खेळाडूंचे लक्ष विचलित होणार नाही याकडे लक्ष्य दिले होते. त्यासाठी त्याने अंतिम सामान्यांपर्यंत फोनही न वापरण्याचा सल्ला खेळाडूंना दिला होता. त्याच्या या सल्याचेही खेळाडूंनी पालन केले होते.

द्रविडने २०१५ मध्ये १९ वर्षांखालील आणि भारत अ संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले होते. तेव्हापासून त्याच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही संघांची कामगिरी उत्तम राहिली आहे. २०१६ मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकातही भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र त्यांना विंडीज संघाकडून पराभव मिळाला होता.

द्रविडने त्याच्या कारकिर्दीत एकूण ३४४ सामने खेळले आहेत पण त्याला एकदाही विश्वचषक जिंकण्याची संधी मिळाली नव्हती. पण आता एक प्रशिक्षक म्हणून जिंकलेल्या या १९ वर्षांखालील विश्वचषकाने नक्कीच द्रविडच्या मनातली विश्वचषक न जिंकल्याची सल काढून टाकली असेल.