राष्ट्रकुल २०१८: भारत-पाकिस्तान हाॅकी सामना बरोबरीत

गोल्ड कोस्ट | राष्ट्रकुल स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान हाॅकी सामन्यात भारतीय संघाला शेवटच्या ७ सेकंदात पाकिस्तानकडून झालेल्या गोलमुळे बरोबरीत समाधान मानावे लागले. 

कर्णधार मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करण्याची मोठी संधी दवडली. 

या संपुर्ण सामन्यात भारतीय संघाचे वर्चस्व राहिले होते परंतु अखेरची काही मिनीटे अप्रतिम खेळ करत पाकिस्तानने भारताच्या तोंडचा घास पळवला. 

पहिली काही मिनीटे भारताने जोरदार सुरूवात केली परंतु गोल करण्यात संघाला अपयश येत होते. पहिली १० मिनीटे दोन्ही संघ एकमेकांची ताकद आजमवताना दिसले. परंतु १३व्या मिनीटाला सुनीलच्या एका चांगल्या पास दिलप्रीत सिंगने भारतासाठी पहिला गोल केला.

त्यानंतर १९व्या मिनीटाला पुन्हा गोल करत भारताने आघाडी २-० अशी वाढवली. भारताकडून दुसरा गोल हरमनप्रीतने केला. यादरम्य़ान भारताने अनेक संधी दवडल्या. 

अखेर २५व्या मिनीटाला पाकिस्तानकडून गोल करण्याचा प्रयत्न गोलकीपर श्रीजेशने हाणून पाडला. ३८व्या मिनीटला इरफान ज्यूनियरने पाकिस्तानकडून गोल करत पिछाडी भरून काढली. 

त्यानंतर पाकिस्तान संघाने गोलच्या अनेक संधी निर्माण केल्या परंतु त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात त्यांना अपयश आले. अखेर शेवटची ७ सेकंद बाकी असताना पेनल्टी काॅर्नरवर गोल करत पाकिस्तानने सामन्यात बरोबरी केली. 

भारताने या स्पर्धेत यापूर्वी दोन वेळा रौप्यपदक मिळवले आहे. भारताला २००६ मध्ये मेलबर्न येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. २०१० मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या लढतीत भारताने त्यांचा दणदणीत पराभव केला होता.