क्रिकेटपटूंनी गमावले, या खेळाडूंनी कमावले

काल जागतिक स्थरावर वेगवेगळ्या खेळात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. काल बॅडमिंटन, हॉकी, टेनिस, गोल्फ अशा क्रिकेट व्यतिरिक्त खेळात भारताची उत्तम कामगिरी झाली आहे.

भारतीय हॉकी संघ आशिया चॅम्पियन: काल भारतीय हॉकी संघाने मलेशिया संघाचा २-१ असा पराभव करत तिसऱ्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. भारतीय संघाकडून रामनदीप सिंग (३’) आणि ललित उपाध्याय (२९’) यांनी प्रत्येकी एक गोल करत विजयात मोलाची कामगिरी बजावली.

भारताने या आशिया हॉकी चषक २०१७ स्पर्धेत पाकिस्तानला दोनदा पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. भारतीय संघ या स्पर्धेत एकदाही पराभूत झाला नाही. तसेच भारतीय संघाने याआधी २००३ आणि २००७ साली आशिया चषक जिंकला होता.

बॅडमिंटनमध्ये किदांबी श्रीकांतचे वर्चस्व: भारताच्या किदांबी श्रीकांतने काल डेन्मार्क सुपर सिरीज जिंकली. त्याने अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाच्या ली ह्युनवर २१-१०,२१-५ अशी सहज मात केली.

श्रीकांतचे हे या वर्षातले तिसरे सुपर सिरीज विजेतेपद आहे. तो याआधी इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया सुपर सिरीज जिंकला आहे तसेच सिंगापूर सुपर सिरीजमध्ये उपविजेता झाला होता.

टेनिसमध्ये दिवीज शरण विजेता: काल दिवीज शरणने त्याच्या अमेरिकन साथीदार स्कॉट लिप्सकीसह दुहेरीत युरोपिअन ओपन ट्रॉफी जिंकली. त्याचे हे २०१७ मधील पहिलेच एटीपी वर्ल्ड टूरमधील विजेतेपद आहे.

दिवीज शरण आणि स्कॉट लिप्सकी या जोडीने सॅंटियागो गोन्झालेझ आणि ज्युलिओ पेराल्टा या जोडीवर ६-४,२-६,१०-५ असा विजय मिळवला.

गॉल्फमध्ये गगनजीतची उत्तम कामगिरी: भारतीय गोल्फ खेळाडू गगनजीत भुल्लरने मकाऊ ओपन स्पर्धा काल जिंकली. हे त्याचे ८ वे आशिया टूर विजेतेपद जिंकले आहेत. तसेच तो दुसऱ्यांदा मकाऊ ओपन स्पर्धा जिंकला आहे. याआधी २०१२ मध्ये तो मकाऊ ओपन स्पर्धा जिंकला होता.

या विविध खेळात भारताचे खेळाडू उत्तम कामगिरी करत असताना भारतात लोकप्रिय असणाऱ्या क्रिकेट खेळात मात्र भारतीय संघाने काल न्यूजीलँडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात ६ विकेट्सने पराभव स्वीकारला.