कोपा डेलरेच्या विजेतेपदावर बार्सेलोनाचा सलग चौथ्यांदा शिक्कामोर्तब

बार्सेलोनाचा मागील आठवड्यात रोमा विरुद्ध झालेला धक्कादायक पराभव आणि त्यामुळे युएफा चॅम्पियन्स लीगमधून बाहेर पडावे लागल्याने या वर्षीचे त्यांचे तीन चषक जिंकायचे स्वप्न धुळीस मिळाले. लीगमध्ये अपराजितचा रहायचा विक्रम करणार्या बार्सेलोनाला किमान २ तरी चषक जिंकून हा हंगाम काही प्रमाणात यशस्वी रित्या पार पाडायचा होता.

त्यासाठीच आज कोपा डेलरेच्या अंतिम सामन्यात त्यांची लढत सेविल्ला संघाबरोबर होती. मागील तीन वर्ष लागोपाठ ही स्पर्धा जिंकणार्या बार्सेलोनाचा सेविल्लाने नुकत्याच झालेल्या लीग सामन्यात घाम काढत सामना एकतर्फी केला होता पण मेस्सीच्या शेवटच्या मिनिटच्या गोलने त्यांनी सामना बरोबरीत सोडवला होता.

आज सामन्याची सुरुवातच बार्सेलोनाने आक्रमण करत केली. सामन्यावर सुरुवातीला पकड ठेवण्यात यश मिळल्याने १४ मिनिटला काॅटिन्होने गोलकीपरला चकवत बाॅल सुवारेझकडे दिला आणि त्याने फक्त दिशा दाखवत पहिला गोल केला.

या नंतर बार्सेलेनाने सेविल्लाला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही. ३१ मिनिटला इनिएस्टा आणि अल्बाने संधी निर्माण केली आणि अल्बाने मेस्सीला मागे पास दिला जो त्याने कसलाही विलंब न करता गोल मध्ये रुपांतरीत केला आणि आघाडी २-० ची केली.

पहिल्या हाफचे शेवटचे ५ मिनिट बाकी असताना मेस्सी आणि सुवारेझने सेविल्लाच्या बचावफळीतून बाॅल काढत आक्रमण केले सुवारेझने मेस्सीचा मिळालेला पास सेविल्लाच्या हाफ पासून पुढे घेऊन जात गोल करत बार्सेलोनाला पहिल्या हाफ अखेर ३-० ची बढत मिळवून दिली.

दूसरा हाफ सुरु झाला आणि ७ मिनिट नंतर ५२ मिनिटला मेस्सी आणि इनिएस्टाने बार्सेलोनाचा पारंपारिक समजला जाणारा खेळ करत जागा तयार केली आणि कदाचित आपला शेवटचा कोपाचा अंतिम सामना खेळणार्या इनिएस्टाने गोल करत सामन्यात ४-० ची आघाडी मिळवून दिली.

सामन्याचा निकाल जरी ठरला असला तरी बार्सेलोनाने खेळात आक्रमकता तशीच कायम ठेवली आणि त्याचाच फायदा म्हणून त्यांना ६९ मिनिटला पेनल्टी मिळाली. सामन्यात गोल करण्यात अपयश आलेल्या काॅटिन्होला कीक दिली आणि त्याने त्याचे गोल मध्ये रुपांतर करत बार्सेलोना साठी पाचवा गोल केला.

८८ व्या मिनिटला इनिएस्टाला परत बोलवले आणि दोन्ही संघाच्या प्रेक्षकांनी त्याला उभे राहून टाळ्या वाजवत निरोप दिला. हे पाहून इनिएस्टाला अश्रू अनावर झाले. हे इनिएस्टाच्या कारकिर्दितील ३१ वे विजेतेपद होते.

बार्सेलोनाने आजच्या विजयाबरोबरच तब्बल तिसाव्यांदा कोपा डेलरेवर आपले नाव कोरले आणि सलग चौथ्यांदा सुद्धा हा चषक आपल्या नावे केला. त्या खालोखाल २३ वेळा ॲथलेटिक क्लबने हा चषक आपल्या नावे केला आहे.
https://twitter.com/fcbarcelona/status/987839672104701952?s=21

मेस्सीने सेविल्ला समोर ३३ सामन्यात ३० गोल्स केले आहेत जे कोणत्याही संघाविरुद्ध सर्वाधिक आहेत.

मेस्सीहा केवळ दूसरा खेळाडू आहे ज्याने कोपा डेलरेच्या ५ अंतिम सामन्यात गोल्स केले आहेत. या आधी फक्त टेल्मो झाराने हा पराक्रम केला होता.

सुवारेझचा गोल हा बार्सेलोनासाठीचा १९३ सामन्यातूल १५० वा गोल होता. या बरोबरच त्याने बार्सेलोनासाठी खेळलेल्या प्रत्येक अंतिम सामन्यात गोल केला आहे.

आज गोल करत मेस्सी या मोसमातील सर्व स्पर्धांमध्ये एकुण ४० गोल्स करणारा तिसरा खेळाडू ठरला. या आधी रोनाल्डो (४२) आणि सलाहने (४१) यांनीच फक्त ४० पेक्षा अधिक गोल्स केले होते. या बरोबरच सलग ९ मोसम मेस्सीने ४० पेक्षा अधिक गोल्स केले आहेत.