गूगल ट्रेंडनुसार २०१७मध्ये क्रिकेटच ठरला भारतात सर्वात लोकप्रिय खेळ

भारतात नेहमीप्रमाणे अपेक्षित असणाराच क्रिकेटचा खेळ गूगल ट्रेंड नुसार आवडता ठरला आहे. यावर्षी भारतीय क्रिकेट संघानेही चांगली कामगिरी केली. त्यामुळे ते सतत चर्चेत राहिले.

या वर्षात भारतीय संघाने एकही द्विपक्षीय मालिकेत पराभव स्वीकारला नाही आणि हे वर्ष ५३ सामन्यांपैकी ३७ सामन्यात विजय मिळवत यशस्वी ठरवले. याबरोबरच या वर्षात विराट कोहली, रोहित शर्मा यांनीदेखील अनेक विक्रमांना गवसणी घातली.

तसेच भारतीय संघाने याच वर्षी पार पडलेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफीतच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. परंतु भारताला पाकिस्तान विरुद्ध या अंतिम सामन्यात पराभव मिळाला होता.

तसेच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि चॅम्पिअन्स ट्रॉफीला यावर्षी खेळांमध्ये सर्वात जास्त गूगलवर सर्च करण्यात आल्याचाही या ट्रेंड मधून दिसून आले.

यावर्षात भारतीय संघ चॅम्पिअन्स ट्रॉफी, विंडीज दौरा आणि श्रीलंका दौऱ्यासाठी फक्त भारताबाहेर खेळला. बाकी सर्व सामने भारतीय संघ भारतातच खेळला.

यावर्षीची सुरुवात इंग्लंड विरुद्ध वनडे मालिकेने झाली. पण त्यापूर्वी वर्षाच्या सुरुवातीलाच एम एस धोनीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून कर्णधार पद सोडल्यामुळे विराट कोहलीला कर्णधार करण्यात आले होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने विराटच्या नेतृत्व पर्वाला सुरुवात झाली होती.

यानंतर भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला चांगलीच लढत दिली होती पण भारतानेही आपण कसोटीत अव्वल आहोत हे दाखवून दिले होते.

या मालिकेनंतर आयपीएलला सुरुवात झाली होती. यावर्षीच्या आयपीएल मध्ये महाराष्ट्र डर्बीचा सामना अंतिम फेरीत रंगला होता. यात मुंबई इंडियन्सने पुणे सुपर जायंट्सवर अटीतटीच्या लढतीत १ धावेने विजय मिळवला होता.

त्यानंतर रंगलेली चॅम्पिअनस ट्रॉफी गूगलवर खेळांमध्ये सर्वात जास्त सर्च करण्यात आलेल्या गोष्टींपैकी दुसऱ्या क्रमांकावर होती. भारतीय संघाने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती पण त्यांना अंतिम सामन्यात पाकिस्तानवर मात करण्यात अपयश आले.

भारतीय संघाने यानंतर मात्र सर्वच प्रकारच्या क्रिकेटवर वर्चस्व गाजवले त्यांनी विंडीज संघ, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका या सर्वांनाच पूर्णपणे निष्प्रभ केले. याबरोबरच वर्षाअखेरीस क्रिकेट चाहत्यांना रोहितच्या वनडेतील तिसऱ्या द्विशतकाचाही आनंद घेता आला.

गूगलवर खेळांमध्ये सर्वात जास्त सर्च करण्यामध्ये आयपीएल आणि चॅम्पिअन्स ट्रॉफीनंतर विम्बल्डन, डब्लूडब्लूइ आणि प्रो कबड्डी यांना सर्च करण्यात आले. तसेच या यादीत पहिल्या दहामध्ये यावर्षी पार पडलेल्या महिलांचा विश्वचषक, आयएसएल यांनाही स्थान मिळाले आहे.