भारताचा युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला बीसीसीआयने दाखवला बाहेरचा रस्ता

भारताचा उदयोन्मुख यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला इंग्लंड दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय ‘अ’ संघातून डच्चू देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआय भारतीय खेळाडूंच्या शारीरिक तंदूरूस्तीबाबत जास्तच जागृत झालेली आहे. त्याचसाठी गेल्या वर्षीपासून यो-यो टेस्टचा अवलंब बीसीसीआयने केला आहे.

इंग्लंड दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय ‘अ’ संघाची शुक्रवारी राष्ट्रीय क्रिकेट आकादमी बेंगलोर येथे यो-यो चाचणी घेण्यात आली. यामध्ये संजू सॅमसन वगळता सर्व खेळाडूंनी ही चाचणी उत्तिर्ण होण्यासाठी लागणारे 16.1 गुण मिळवले.

तसेच 14 जूनला अफगाणिस्तान विरूद्ध होत असलेला कसोटी सामना व इंग्लंड दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय संघाचीही शनिवारी यो-यो टेस्ट झाली. त्यामध्ये सर्व भारतीय खेळाडू उत्तीर्ण झाले आहेत.

भारतीय युवा संघाचे प्रशिक्षक राहूल द्रविड यांचे ज्या मोजक्या खेळाडूंकडे विशेष लक्ष आहे त्यामध्ये संजू सॅमसनचाही समावेश आहे. तसेच आयपीयल 2017 मोसमात संजू सॅमसन राहूल द्रविड प्रशिक्षक असलेल्या देल्ली डेअरडेव्हील्स संघाचा भाग होता. त्यावेळी द्रविड यांना सॅमसनच्या खेळावर विशेष लक्ष दिले होते.

2018 आयपीयल आणि विजय हजारे चषकात चांगली कामगिरी केल्यामुळे त्याला भारतीय ‘अ’ संघात स्थान मिळाले होते.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय ‘अ’ संघ रविवारी इंग्लंडला रवाना झाला. या दौऱ्यासाठी संजू सॅमसन आणि ऋषभ पंत असे दोन यष्टरक्षक होते. संजू सॅमसनला वगळले असले तरी त्याच्यासाठी बदली यष्टीरक्षकाची अजून निवड झाली नाही.