मोहम्मद कैफ बनणार प्रशिक्षक !

भारताचा माजी फलदांज मोहम्मद कैफ आता अफगाणिस्तान संघाचा प्रशिक्षक बनणार आहे. एक महिन्यापूर्वीच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताचा माजी सलामीवीर फलंदाज लालचंद राजपूत यांची अफगाणिस्तानच्या संघाचा प्रशिक्षक म्हणून करार न वाढवण्याचे ठरवले होते. आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मोहम्मद कैफला प्रशिक्षक पदासाठी विचारले आहे.

कैफने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी १३ कसोटी आणि १२५ वनडे सामने खेळले आहे. नुकतेच त्याला रणजीमधील छत्तीसगड संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय कैफ आणि एसीबीचे आतिफ माशाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्टेनिकझाई यांची बैठक या आठवड्यात होणार आहे. जर कैफने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची ही ऑफर घेतली तर त्याला रणजी क्रिकेटमधूनही निवृत्ती घ्यावी लागेल.

मोहम्मद कैफ हे नाव घेतल्यानंतर प्रत्येक भारतीय क्रिकेट प्रेमींच्या डोळ्यासमोर एक क्षण येतो तो म्हणजे २००२मध्ये इंग्लंडविरुद्ध नेटवेस्ट मालिकेतील अंतिम सामन्यातील लॉर्ड्सवरील नाबाद ८७ धावांची ऐतिहासिक खेळी. कैफच्या अविस्मरणीय खेळीमुळेच भारताने अंतिम सामना जिंकला होता.