क्रिस्तिआनो रोनाल्डो पुन्हा एकदा ठरला मेस्सी आणि नेमारपेक्षा सरस !!

काल रात्री लंडन येथे फीफाच्या दी बेस्ट या पुरस्काराचा वितरण समारंभ झाला. सर्वोत्कृष्ट फुटबाॅलर, गोलकीपर, फॅन्स, कोच, तसेच सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंचा संघ अश्या विविध पुरस्कारांनी खेळाडूंना गौरवण्यात आले. या सोहळ्याला सर्व खेळाडूंनी आवर्जून उपस्थिती नोंदवली.

२०१६ पासून चालू झालेल्या या सोहळ्याकडे तमाम फुटबाॅल प्रेमींचे लक्ष होते. २०१६ च्या आधी ६ वर्षे हा सोहळा फ्रांसच्या बहुचर्चित ‘बॅलन डी ओर’ बरोबर संयुक्त रीत्या दिला जायचा. त्या ६ वर्षात हा फीफा ‘बॅलन डी ओर’ ४ वेळा मेस्सी तर २ वेळा रोनाल्डोने जिंकला. त्या आधी फीफा ‘वर्ल्ड प्लेयर ऑफ दी इयर’ हा पुरस्कार देत असे.

या वर्षी अर्सेनलच्या जिरुडला त्याच्या स्काॅर्पियन कीकसाठी पुस्कस अवाॅर्ड दिला. हा अवाॅर्ड वेगळ्या पद्धतीने उत्तम फिनिश देऊन केलेल्या गोलला दिला जातो. सर्वोत्कृष्ट पुरुषांच्या संघाचा कोच म्हणून झिनादेन झिदानला तर महिलांच्या संघासाठी सरीना विगमनला गौरवण्यात आले.

इटली आणि क्लब जुवेंटसची अभेद्य वाॅल समजला जाणारा जीजी बुफाॅनला सर्वोत्कृष्ट गोलकीपरचा अवाॅर्ड मिळाला. येत्या जानेवारीत ४० वर्षाच्या होणाऱ्या बुफाॅनने परत एकदा दाखवून दिले की वय हा त्याच्यासाठी केवळ एक आकडा आहे.

सेल्टिक फुटबाॅल क्लबच्या फॅन्सच्या पाठिंब्यामुळे त्यांना ‘फीफा फॅन अवाॅर्ड’ मिळाला. तर त्वरित प्रथमोपचार करुन विरोधी संघाच्या गोलकीपरचे प्राण वाचवणाऱ्या फ्रॅन्सिस कोनेला ‘फेयर प्ले अवाॅर्ड’ दिला गेला.

अंतिम टप्प्यात सर्वोत्कृष्ट संघ आणि खेळाडू यांची घोषणा झाली. सर्वोत्कृष्ट संघ खालील प्रमाणे:

बुफाॅन (गोलकीपर)
डॅनी ॲलवस, मार्सेलो, रामोस, बोनुची (डिफेंडर्स)
माॅड्रीक, क्रुस, इनिएस्टा (मिडफिल्डर्स)
मेस्सी, नेमार, रोनाल्डो (फाॅर्वड).

सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू नेदरलॅन्ड आणि बार्सिलोनाची लीके मार्टेन्सला तर पुरुषांमध्ये पोर्तुगाल आणि रियल मॅद्रिदच्या रोनाल्डोला मिळाला. मेस्सी २ तर नेमार ३ नंबरला होते.

नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)