मॅन्चेस्टर सिटीचा विजयी रथ क्रिस्टल पॅलेसने रोखला.

मॅन्चेस्टर सिटीचा विजयी रथ क्रिस्टल पॅलेसने रोखत सर्वांना एक धक्का दिला. १९ वा विजय नोंदवून नवा विक्रम प्रस्थापित करतील अशी सगळ्यांना आशा असतानाच त्यांचा क्रिस्टल पॅलेस बरोबर सामना ०-० असा बरोबरीत सुटला. या सामन्यानंतर सुद्धा मॅन्चेस्टर सिटी गुणतालीकेत पहिल्या स्थानावर १४ गुणांच्या आघाडीने आहे.

आपला या मौसमातला २१ वा सामना खेळणारे मॅन्चेस्टर सिटी त्यांचा सध्याचा खेळ पाहता आज नवीन विक्रम रचतील अशी आशा सर्व फुटबाॅल प्रेमींना होती.

पहिल्या हाफ मध्ये १२ व्या मिनिटला गॅब्रियल जिसस दुखापतग्रस्त झाला पण तो पुन्हा मैदानावर आला आणि तेच कदाचित त्याला महागात पडले.

२४ व्या मिनिटला त्याने रडत रडत मैदान सोडले आणि ॲगवॅरो त्याचा बदली खेळाडू म्हणुन मैदानात आला. पहिल्या हाफ मध्ये ७२% बाॅल आपल्या ताब्यात ठेवण्यात जरी सिटीला यश आले असले तरी गोल करायच्या खुप कमी संधी निर्माण झाल्या आणि सामना पहिल्या हाफ मध्ये ०-० असा बरोबरीत राहीला.

दूसऱ्या हाफला रहिम स्टर्लिंगला सुद्धा मैदानावर उतरवले. सिटीचा डीब्रुनेने पण काही संधी निर्माण केल्या पण गोलमध्ये रुपांतर करण्यात अपयश आले. शेवटच्या काही मिनिटात सिटीने पूर्णपणे गोलचे प्रयत्न केले.

९२ व्या मिनिटला क्रिस्टल पॅलेसला पेनल्टी मिळाली आणि विजयाची आशा घेऊन उतरलेल्या सिटीवर पराभवाची छाया होती पण सिटीचा गोलकीपर एडरसनने अप्रतिम रित्या गोल वाचवत सामन्यात सिटीला कायम ठेवले.

अतिरिक्त वेळेत डीब्रुने दुखापतग्रस्त झाला आणि २०१७ चा शेवटचा सामना सिटीसाठी खुपच अवघड गेला.

सिटीचे जिसस २ महिन्यांसाठी दुखापतग्रस्त तर डीब्रुने सामन्यानंतर ठीक आहे आणि पुढील सामने खेळेल असे घोषित करण्यात आले.

१८ सामने जिंकत पेपच्या सिटीने प्रिमियर लीग मध्ये नवीन विक्रम रचला तर आपलाच बायर्न तर्फेचा २०१३-१४ मौसमातील १९ विजयांचा विक्रम मोडण्यात थोडक्यात अपयश आले.

१४ गुणांची आघाडी घेत २०१८ मध्ये प्रवेश करणार्या सिटीला चेल्सी दूसर्या तर मॅन्चेस्टर युनाएटेड तिसऱ्या स्थानावरुन कितपत आव्हान देऊ शकते ते पाहण्यासारखे असेल.

इतर सामन्यात चेल्सीने स्टोकसिटीचा ५-० तर लिवरपुलने लिसिस्टर सिटीचा २-१ ने पराभव केला.