राष्ट्रकुल स्पर्धा २०१५: भारताला बॉक्सिंगमध्ये तीन पदके

गोल्ड कोस्ट | ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आज बॉक्सिंगमध्ये तीन कांस्यपदके मिळाली आहे. ही पदके हुसामुद्दीन मोहम्मद, नमन तन्वर आणि मनोज कुमारने या खेळाडूंनी मिळवून दिली आहेत.

हुसामुद्दीन मोहम्मदने ५६ किलो वजनी गटात, नमन तन्वरने ९१ किलो वजनी गटात आणि मनोजने ६९ किलो वजनी गटात ही कामगिरी केली आहे.

हुसामुद्दीनला आज उपांत्य सामन्यात इंग्लंडच्या पीटर मॅकग्रील विरुद्ध ०-५ फरकाने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे हुसामुद्दीनला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

त्याचबरोबर १९ वर्षीय तन्वरलाही आज उपांत्य सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याला ऑस्ट्रेलियाच्या जेसन व्हॉटलेयने ०-४ फरकाने पराभूत केले, तर मनोजला उपांत्य सामन्यात इंग्लंडच्या पॅट मॅकॉरमॅकने ०-५ फरकाने पराभूत केले.

भारताला आत्तापर्यंत ४२ पदके मिळाली आहेत. यात १७ सुवर्ण, ११ रौप्य आणि १४ कांस्य पदकांचा समावेश आहे.