राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: हॉकीत भारतीय पुरुष संघाची हाराकिरी

२१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाला आज उपांत्य सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांना न्यूझीलंडने २-३ च्या फरकाने पराभूत केले. यामुळे भारतीय संघ सुवर्णपदकाच्या शर्यंतीतून बाहेर पडला आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने चांगली सुरुवात करताना पहिल्या सत्रात ७ व्याच मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर लगेचच १३ व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या जेनेसने गोल करून न्यूझीलंडची आघाडी ०-२ ने वाढवली.

भारताकडून पहिला गोल दुसऱ्या सत्राच्या अखेरच्या क्षणी २९ व्या मिनिटाला झाला. भारताकडून हा गोल हरमनप्रीत सिंगने केला. पण त्यानंतर भारताला तिसऱ्या सत्रात एकही गोल करण्यात अपयश आले. पण न्यूझीलंडने मात्र त्यांची आघाडी पेनल्टी कॉर्नरवर गोल करून वाढवली. न्यूझीलंडला ४० व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता.

त्यामुळे न्यूझीलंड तिसऱ्या सत्रापर्यंत १-३ अशा फरकाने आघाडीवर होता. अखेरच्या सत्रात भारताने शेवटची ३ मिनिटे बाकी असताना गोल केला. भारताकडून हा गोलही हरमनप्रीत सिंगने केला. पण त्यानंतर भारताला बरोबरी करण्यात किंवा आघाडी घेण्यात अपयश आले. त्यामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला.

या सामन्यात भारतीय संघाला बऱ्याच पेनल्टी कॉर्नरच्या संधी मिळाल्या होत्या, पण यावर भारतीय खेळाडूंना गोल करण्यात अपयश आले.

या पराभवामुळे भारतीय संघ जरी सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी भारताला कांस्य पदक मिळवण्याची संधी आहे. यासाठीचा सामना उद्या होईल. आज इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जो संघ पराभूत होईल त्या संघाविरुद्ध भारताला कांस्यपदकासाठी लढावे लागेल.