राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: नीरज चोप्राची भालाफेकमध्ये सुवर्णमय कामगिरी

गोल्ड कोस्ट। ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नीरज चोप्राने भारताला २१ वे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. हे पदक त्याने भालाफेक क्रीडा प्रकारात मिळवले आहे.

तसेच तो राष्ट्रकुल स्पर्धेत भालाफेकमध्ये पदक मिळववणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो फक्त चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.

याआधी मिल्खा सिंग (१९५८), कृष्णा पुनिया (२०१०) आणि विकास गौडा (२०१४) यांनी अॅथलेटिक्समध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.

नीरज चोप्राने आज पहिल्या प्रयत्नात ८५.५० मीटरचा भालाफेक केला होता . त्यानंतर त्याला दुसऱ्या प्रयत्नात अपयश आले. पण लगेचच त्याने तिसऱ्या प्रयत्नात ८४.७८ मीटरचा भालाफेक केला आणि चौथ्या प्रयत्नात विक्रमी ८६. ४७ मीटरचा भालाफेक करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या हमीष पिकॉकला रौप्यपदक आणि ग्रेनेडाच्या अँडरसन पीटरला कांस्यपदक मिळाले आहे.

त्याने मार्चमध्ये पटियालाला झालेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत सहाव्या प्रयत्नात ८५.९४ मीटरचा भालाफेक केला होता. यामुळे तो राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.

भारताने आत्तापर्यंत २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत ५० पदके मिळवली आहेत. यात २२ सुवर्णपदके, १३ रौप्य आणि १५ कांस्यपदकांचा समावेश आहे.