राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: सिंधूवर मात करत सायनाची सुवर्ण पदकाला गवसणी

गोल्ड कोस्ट| २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू चांगलेच चमकले आहेत. आज सगळ्यांनाच उत्सुकता असलेला सायना नेहवाल विरुद्ध पीव्ही सिंधू यांचा महिला एकेरीचा अंतिम सामना पार पडला.

या सामन्यात भारताची फुलराणी सायना नेहवालने सिंधूवर मात करत सुवर्णपदक पटकावले. सायनाने सलग दोन सेटमध्ये सिंधूचा 21-18, 23-21 असा पराभव केला.

या निर्णायक सामन्यात सायनाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले.  ज्यामुळे देशातील अव्वल खेळाडू आणि ऑलम्पिक पदक विजेच्या सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. 

या दोघानींही एकमेकींना चांगले आव्हान दिले होते. पण अखेर अतीतटीच्या झालेल्या सामन्यात सायनाने वर्चस्व ठेवले आणि २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेतील दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. दोघींच्या या कामगिरीमुळे भारताच्या खात्यात सुवर्ण आणि रौप्य ही दोन्ही पदके आली आहे.

सायनाने आतापर्यंत या स्पर्धेत 12 सामने खेळले असून ती यात अपराजित राहिली आहे.

तसेच सायना राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटनच्या एकेरी प्रकारात दोन सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. 2010 ला दिल्लीत झालेल्या  राष्ट्रकुल स्पर्धेत तिने मलेशियाच्या वोंग म्यू चूला हरवून सुवर्ण पदक जिंकले होते.

तसेच सिंधूने 2014 ला ग्लासगो  राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते.