राष्ट्रकुल स्पर्धाे 2018: टेबल टेनिसमध्ये पुरूष दुहेरीत भारताला दोन पदके

गोल्ड कोस्ट| ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये पुरूष दुहेरीत भारताच्या अचंता शरथ आणि ज्ञानसेकरन सथियान या जोडीने रौप्य तर हरमीत देसाई आणि सनील शंकर शेट्टी या जोडीने कांस्य पदक मिळवले.

सुवर्ण पदकाच्या लढतीत अचंता शरथ आणि ज्ञानसेकरन सथियान या भारतीय जोडीला इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉल आणि लियाम पिचफोर्ड या जोडीकडून पराभूत व्हावे लागले.

पाच फेरीच्या या सामन्यात अचंता आणि ज्ञानसेकरन यांना 2-3 ने हार पत्करावी लागली.  भारताच्या या जोडीने सर्व्हिस आणि शॉट्समध्ये अनेक चुका केल्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

तसेच उंपात्य फेरीत या जोडीने  सिगांपूरच्या पँग येवन एन कोईन आणि पोह शाओ फेंग इथान यांच्यावर 3-1 ने मात केली होती.

कांस्य पदकाच्या लढतीत भारताच्या हरमीत देसाई आणि सनील शंकर शेट्टी या जोडीने सिगांपूरच्या पँग येवन एन कोईन आणि पोह शाओ फेंग इथान या जोडीचा 3-0 ने पराभव केला. तीन फेरीच्या या सामन्यात हरमीत आणि सनील यांनी पँग येवन एन कोईन आणि पोह शाओ फेंग इथान या जोडीला 11-5, 11-6, 12-10 असे सलग तीन फेरीत पराभूत करत सामना ३-० असा जिंकला.

दिवसअखेर भारत 59 पदकांसह पदकतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये 25 सुवर्ण, 16 रौप्य आणि 18 कांस्य पदकांचा समावेश आहे.