राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: बॅडमिंटन पुरुष दुहेरीत भारताला एेतिहासिक पदक

गोल्ड कोस्ट| ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारताला शेवटच्या दिवशी बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत एेतिहासिक राैप्यपदक मिळाले आहे. सात्विक रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने भारताला बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत एेतिहासिक पहिले पदक मिळवुन दिले.

सात्विक रांकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीला अंतिम सामन्यात इंग्लंडच्या मार्कस इलिस व ख्रिस लॅंगरीज या जोडीकडुन 13-21,16-21 असा पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे सात्विक रांकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीला राैप्यपदकावरच समाधान मानावे लागले.

39 मिनिटे चाललेल्या सामन्यात भारताची जोडी पहिल्या फेरीतच 7-11 अशी पिछाडीवर होती.  या फेरीच्या मध्यांतरानंतर देखील इंग्लंडच्या जोडीने आघाडी कायम ठेवली व 16 मिनिटांतच पहिल्या फेरीत विजय मिळवला.

23 मिनिटे चाललेल्या दुसऱ्या फेरीत देखील इंग्लंडच्या जोडीने भारतीय जोडीला सामन्यात परतण्याची एकही संधी  दिली नाही.  या फेरीत मध्यांतरापंर्यंत इंग्लंडच्या जोडीकडे 14-10 अशी आघाडी होती. ती आघाडी त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवली.

भारताचे हे राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटनमधील सहावे पदक आहे. भारताला २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण ६६ पदके मिळाली आहेत. यात २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्यपदकांचा समावेश आहे.