फलंदाजांनो सावधान, स्टेनगन लवकरच धडाडणार!

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केले आहे. त्याची श्रीलंका विरूद्धच्या दोन कसोटी सामन्यासाठी संघात निवड झाली आहे.

86 कसोटी सामन्यात 419 विकेट्स 

34 वर्षीय स्टेनने 86 कसोटी सामन्यात 22.32 च्या सरासरीने 419 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने जर या सामन्यांत 3 विकेट्स घेतल्या तर तो दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनेल.

याआधी शॉन पोलकने 108 कसोटी सामन्यात 421 विकेट्स घेतल्या आहेत.

आयसीसी कसोटी गोलंदाजीच्या क्रमवारीत पहिला असणारा कागिसो रबाडा पण पाठीच्या दुखापतीने त्रस्त अाहे. तो या कसोटीसाठी संघात आहे पण या खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे.

स्टेन सध्या हॅम्पशायरकडून काऊंटी क्रिकेट खेळत आहे.

याआधी तो खांद्याच्या दुखापतीमुळे 13 महिने संघाच्या बाहेर होता. या दुखापतीतून सावरत त्याने भारताविरूद्धच्या कसोटी सामन्यात पुनरागमन केले होते.

दक्षिण आफ्रिकेने जिंकलेला हा सामना जानेवारीत न्यूलॅंड्स येथे खेळला गेला. यामध्येही त्याच्या टाचेला दुखापत झाली होती.

“आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणे हे खूप महत्वाचे आहे. मला माझ्या कारकिर्दीत अजून बरेच काही मिळवायचे आहे. 100 कसोटी सामने आणि 500 विकेट्स हे लक्ष्य जर पूर्ण झाले तर खूपच चांगले”, असे स्टेन म्हणाला.

“27 जूनला मी 35 वर्षाचा होणार आहे. पण मला अजून क्रिकेट खेळायचे आहे. मी 38 काय 39 वर्षाचा होईपर्यंतही खेळू शकतो”, असे स्टेन पुढे म्हणाला.

आताच त्याचे संघ सहकारी एबी डिविलियर्स आणि मोर्ने मॉर्केल यांनी 34 आणि 33 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

श्रीलंका विरूद्धचा पहिला कसोटी सामना गॉल येथे 12-16 जुलैमध्ये खेळला जाणार आहे. तर दुसरी कसोटी कोलंबो येथे 20-24 जुलै दरम्यान खेळली जाणार आहे. यानंतर दोन वन-डे सामने होणार आहेत.

श्रीलंका विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हाशिम आमला, तेंबा बवूमा, क्विंटन डी कॉक, हाइनरिक क्लासेन, केशव महाराज, डीन एल्गार, थेनीस डी ब्रुईन, एडन मारक्रम, लुंगीसनी नगिडी, वरनॉन फिलॅंडर, कागिसो रबाडा, तब्रेज शम्सी, डेल स्टेन, शॉन वोन बर्ग