कसोटीत घेतल्या ४०० विकेट; मात्र तरीही नाही मिळाली आयपीएलमध्ये संधी

बंगळुरूमध्ये गेले दोन दिवस आयपीएल २०१८ साठी खेळाडूंचा लीलाव सुरु होता. या लिलावादरम्यान अनेक आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळाले. या लिलावादरम्यान अनेक तरुण खेळाडूंसाठी कोटींची बोली लागली तर अनेक अनुभवी खेळाडूंना फ्रॅन्चायझींची पसंतीच मिळाली नाही.

यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी गोलंदाज डेल स्टेनचाही समावेश आहे. स्टेनसाठी आयपीएलच्या एकाही फ्रॅन्चायझींनी बोली लावली नाही. वेगवान गोलंदाज स्टेनने अनेकदा त्याच्या संघांसाठी महत्वाचे विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळे तो एक महत्वाचा गोलंदाज मनाला जातो. असे असले तरी त्याला आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठी एकही संघात स्थान न मिळाल्याचे सर्वाना आश्चर्य वाटले.

स्टेनला आयपीएलचा अनुभवही भरपूर आहे. तो या आधी आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, सनरायझर्स हैद्राबाद आणि गुजरात लायन्स या संघांकडून खेळला आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएल कारकिर्दीत ९० सामन्यात खेळताना ९२ बळी घेतले आहेत.

तसेच स्टेनच्या नावावर ८६ कसोटी सामन्यात २२.३२ च्या सरासरीने एकूण ४१९ बळी आहेत. त्याने ११६ वनडेत २६.३२ च्या सरासरीने १८० बळी, तर ४२ आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात १७.३९ च्या सरासरीने ५८ बळी घेतले आहेत.

स्टेनबरोबरच जो रूट, हाशिम अमला, मार्टिन गप्टिल, जेम्स फॉकनर, जोश हेझलवूड, इशांत शर्मा, शॉन मार्श यांसारख्या अनुभवी खेळाडूंनाही या लिलावात फ्रॅन्चायझींनी पसंती दर्शवली नाही.