इतिहास घडला! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोडप्याने प्रथमच केली एकत्र फलंदाजी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी करणारे दक्षिण अफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार डेन वॅन निकर्क आणि अष्टपैलू मरझीन केपशी पहिले जोडपे ठरले आहे. त्यांनी आयसीसी महिला टी२० विश्वचषकात हा कारनामा केला आहे.

८ जूलै रोजी त्या दोघीही विवाहबंधनात अडकल्या होत्या. त्यानंतर आज त्यांनी सोमवारी प्रथमच एकत्र फलंदाजी केली. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात दोघींनी मिळून ६७ धावांची तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी केली.

या सामन्यात कर्णधार असलेल्या डेन वॅन निकर्क ४५ चेंडूत नाबाद ३३ तर मरझीन केपने ४४ चेंडूत ३८ धावा केल्या. हा सामना आफ्रिकेने ७ विकेट्सने जिंकला.

याबरोबर क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडप्याने फलंदाजी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

२००९ साली विश्वचषका दरम्यान या दोघींनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

डेन वॅन निकर्क आणि मरझीन केप या दोघींची क्रिकेट कारकिर्दही बरोबरीने बहरली आहे. दोघींची क्रिकेटमधील कामगिरी प्रभावी राहिली आहे.

डेन वॅन निकर्क एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२५ बळी मिळवले आहेत. ती दक्षिण अफ्रिकेसाठी सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादित अव्वल स्थानी आहे. तर  मरझीन केप ९९ बळी घेत या यादित तिसऱ्या स्थानी आहे.

तर दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादित वॅन निकर्क १,७७० धावांसह चौथ्या स्थानी आहे. मरझीन केपनेही १,६१८ धावा करुन सहावे स्थान मिळवले आहे.

२०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाची माजी महिला क्रिकेटपटू अॅलेक्स ब्लॅकवेलने  इंग्लंडची माजी महिला क्रिकेटपटू लेनसी अॅसक्यू सोबत विवाह केला होता.

तर सध्या न्युझीलंडकडून खेळत असलेल्या महिला क्रिकेटपटू अॅमी सॅचरव्हाइट आणि ली थाहुहू यांनीही मार्च २०१७ मध्ये विवाह केला आहे.