डेविड वॉर्नरसाठी आजचा सामना अनेक अर्थांनी खास !

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आज वनडे कारकिर्दीतील १००वा वनडे सामना खेळत आहे. विशेष म्हणजे वॉर्नरसाठी एक हा सामना अनेक अर्थांनी खास ठरणार आहे. एक आक्रमक फलंदाज ते एक परिपक्व फलंदाज हा प्रवास गेल्या ६ वर्षात ह्या दिग्गज खेळाडूने केला आहे.

ज्या मैदानावर वॉर्नरने नेतृत्व केलेल्या सनरायझर्स हैद्राबादने बेंगलोर संघाला पराभूत करून आयपीएल चषक जिंकला होता त्याच मैदानावर आज वॉर्नर आपला १००वा सामना खेळत आहे हे विशेष.

वॉर्नर म्हणतो, “कधी वाटलंही नव्हतं की ऑस्ट्रेलियाकडून एखादा सामना खेळायला मिळेल. १०० वनडे हा मोठा प्रवास आहे. मला याचा अभिमान वाटतो. मी कधी एवढा मोठा विचारही केला नव्हता.”

वॉर्नरने आपल्या पहिल्याच टी२० सामन्यात २००९ साली तुफानी फटकेबाजी करत ८९ धावांची खेळी केली होती. त्याचमुळे पुढे केवळ ७ दिवसांनी त्याला वनडे संघात तर २ वर्षांनी कसोटी संघात स्थान मिळाले.

वॉर्नर पदार्पणापासून ते २०१४ पर्यंत ५० वनडे सामने खेळला. त्यात त्याने ३१.४१च्या सरासरीने १५३९ धावा केल्या. तर २०१५ ते आजपर्यंत ४९ वनडेत त्याने तब्बल ५८.०५च्या सरासरीने २५५४ धावा केल्या आहेत. पहिल्या ९९ वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वॉर्नर ३ऱ्या क्रमांकावर असून भारतीय कर्णधार विराट कोहलीपेक्षाही त्याने ८ धावा जास्त केल्या आहेत.