महाराष्ट्राचे 20 बाहुबली पदकांच्या शर्यतीत, सुनीतसमोर रामनिवास, जावेद खान, पगडे यांचे आव्हान

पुणे । भारतीय शरीरसौष्ठवाची ताकद दाखवणाऱया भारत श्री स्पर्धेत महाराष्ट्राच्या बाहुबलींची प्राथमिक फेरीत पीळदार करामत पाहायला मिळाली. विक्रमी 584 शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग असलेल्या स्पर्धेतून अंतिम फेरीसाठी 128 खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.

त्यापैकी दहा गटात खेळल्या गेलेल्या पुरूषांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वाधिक 20 खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याचबरोबर तामीळनाडू, मध्य प्रदेश, रेल्वे आणि सीआरपीएफच्या पाचपेक्षा अधिक खेळाडूंनी अंतिम फेरीत स्थान मिळविल्यामुळे टॉप फाइव्हमध्ये स्थान मिळविताना जोरदार पोझयुद्ध पाहायला मिळणार हे निश्चित आहे.

पुरूषांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत तब्बल 426 खेळाडूंच्या सहभागामुळे प्रत्येक गटात टॉप टेनमध्ये स्थान मिळविताना कडवी झुंज पाहायला मिळाली. विक्रमी स्पर्धकानंतर प्रेक्षकांचीही प्राथमिक फेरीला अभूतपूर्व गर्दी लाभली. शरीरसौष्ठवाची खरी ताकद प्राथमिक फेरीतच दिसते. त्यामुळे हाडाच्या शरीरसौष्ठवप्रेमींनी प्राथमिक फेरीला मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

प्रेक्षकांच्या अभूतपूर्व गर्दी सुरू झालेल्या शरीरसौष्ठवाच्या पोझयुद्धात प्रत्येक गटातून टॉप टेनची नावे काढताना पंचांना अक्षरशा घाम फुटला. स्पर्धेच्या प्रत्येक गटात 35 ते 40 शरीरसौष्ठवपटू आणि तेसुद्धा पीळदार, त्यामुळे जजेसनी आधी 15 खेळाडूंची निवड केली आणि त्यांच्याकडून दोन वेळा सात पोझेस मारून घेत अंतिम फेरीसाठी टॉप टेनची निवड केली.

भारतीय शरीरसौष्ठवात महाराष्ट्राची वाढलेली ताकद भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळाली. महाराष्ट्राच्या 20 बाहुबलींनी अंतिम फेरीत धडक मारल्यामुळे अंतिम 50 खेळाडूंमध्येही त्यापैकी किमान 15 खेळाडू पात्र ठरतील, असा विश्वासही महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस ऍड. विक्रम रोठे यांनी बोलून दाखवला.

त्यामुळे यंदाचे सर्वसाधारण सांघिक विजेतेपद महाराष्ट्रालाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 55 किलो वजनी गटात काँटे की टक्कर होणार यात वाद नाही. या गटात महाराष्ट्राच्या संदेश सकपाळ आणि नितीन शिगवण यांनी स्थान मिळविले असले तरी दोघांपैकी एकाला हमखास पदक मिळू शकते. मात्र 60 किलो वजनी गटात मि.वर्ल्ड नितीन म्हात्रेला सुवर्ण पदकाची संधी आहे.

या गटात प्रतिक पांचाळही टॉप फाइव्हमध्ये स्थान मिळवू शकतो. 65 किलो वजनी गटात श्रीनिवास खारवीने टॉप फाइव्हमध्ये स्थान मिळविले तरी ती मोठी गोष्ट असेल. अशीच परिस्थिती 70 किलो वजनी गटात आहे. रितेश नाईककडून महाराष्ट्राला एका पदकाची अपेक्षा आहे. 70 किलो वजनी गटात सुशील मुरकर आणि रविंद्र वंजारीने स्थान मिळवलेय खरे पण गटात मध्यप्रदेश आणि कर्नाटकाच्या खेळाडूंपुढे त्यांचा निभाव लागणे कठिण आहे.

महाराष्ट्रासाठी हमखास पदक 75 किलो वजनी गटात सागर कातुर्डे मिळवून देऊ शकतो. फक्त ते पदक सोन्याची असणार की चांदीचे हे अंतिम फेरीतच कळू शकेल. 85 किलो वजनी गटात महाराष्ट्राचे आव्हान अजय नायरवर आहे तसेच मुंबई श्री सुजन पिळणकरला मुंबई बंदरात नोकरी लागल्यामुळे तो आता मेजर पोर्टच्या संघातून खेळतोय. तरीही सुजन एक पदक जिंकणार हे नक्की आहे.

महाराष्ट्राचा खरा कस 90 किलो वजनी गटात लागणार आहे. या गटात सलग दोनदा भारत श्री जिंकणाऱया सुनीत जाधवला गटविजेतेपदासाठी महाराष्ट्राच्याच महेंद्र चव्हाण, रोहित शेट्टीशी भिडायचे आहे. त्याचबरोबर रेल्वेचा सागर जाधव आणि उत्तर प्रदेशच्या विजय बहादूरचे कडवे आव्हानही त्याला परतावून लावावे लागणार आहे. या गटात महाराष्ट्राकडून किमान दोन पदकांची अपेक्षा आहे.

स्पर्धेतील सर्वात जबरदस्त गट असलेल्या 90-100 किलो वजनी गटात स्पर्धेचे संभाव्य विजेते एकत्र भिडणार आहेत. महाराष्ट्राचा महेंद्र पगडे, रेल्वेचा राम निवास, उत्तराखंडचा अमित छेत्री यापैकी एक गटविजेता असेल आणि स्पर्धेचा विजेताही.

त्यामुळे या गटात कोणाला पदकाच्या कोणत्या रंगाचे चुंबन करायला मिळेल, हे अंतिम फेरीतच कळेल. 100 किलो वजनी गटातही महाराष्ट्राच्या अक्षय मोगरकर आणि अतुल आंब्रपैकी एकाला पदक निश्चित आहे परंतू गटविजेत्याचा मान आंतररेल्वे स्पर्धेचा विजेत्या जावेद अली खानलाच मिळण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्समध्ये सुनीतला जेतेपदाची हॅटट्रीक करणे फारसे सोपे राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रत्येक गट चुरशीचा असल्यामुळे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स नक्की कोण होईल, हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे भारतीय शरीरसौष्ठवाला नवा बाहुबली मिळतो की सुनीतच बाहुबली ठरतो हे पाहणे थरारक असेल.

महिलांची ताकद वाढली…
शरीरसौष्ठवाच्या पुंभमेळ्यात शरीरसौष्ठवपटूंचा विक्रमी सहभाग लाभला, पण त्यात महिला शरीरसौष्ठवपटूंचाही सिंहाचा वाटा होता. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत आठ पीळदार महिलांची उपस्थिती स्फूर्तीदायक होतीच ,पण महिलांनाही अभिमान वाटावा, असा प्रतिसाद महिलांच्या स्पोर्टस् मॉडेल गटात पाहायला मिळाला.

या गटात देशभरातून आलेल्या 35 महिला खेळाडूंची पीळदार देहयष्टी आणि सुडौल बांधा पाहून सारेच थक्क झाले. भारतात बिकीनीवर येऊन आपल्या पीळदार शरीराचे प्रदर्शन आपल्या संस्कृतीच्या विरोधी मानले जात होते.

मात्र आता काळानूसार पुरूंषाप्रमाणे महिलांच्याही मानसिकतेत बदल झाल्याचे चित्र आता पाहायला मिळू लागले आहे. शरीरसौष्ठवात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून आता त्यांचे कुटुंबीयही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू लागले आहेत.

त्याचमुळे मॉडेल स्पोर्टस् सारख्या प्रकारात 35 महिलांची उपस्थितीही शरीरसौष्ठवात एक क्रांतीच म्हणावी लागेल. या स्फूर्तीदायक उपस्थितीमुळे येणाऱया काळात शरीरसौष्ठवाकडे महिलांची पावले वेगाने पडतील, असा विश्वास भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी व्यक्त केला.

या 35 खेळाडूंपैकी सात खेळाडू या महाराष्ट्राच्याच होत्या. तसेच या गटात मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल आणि मणिपूरच्याही महिला खेळाडूंची उपस्थिती लक्षणीय होती. या 35 खेळाडूंमधून अंतिम फेरीसाठी दहा खेळाडू निवडताना जजेसना फार काळजी घ्यावी लागली.

जेतेपदासाठी रंगणाऱया लढतीत महाराष्ट्राच्या रिता तारी, मंजिरी भावसार आणि स्टेला गोडे या मुलींनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. या गटाच्या संभाव्य विजेत्यांच्या यादीत कर्नाटकची अंकिता यादव, मणिपूरची जानसी देवी,मेघालयची क्लॉडिया जेसिका आघाडीवर आहेत. याच गटात पन्नाशी ओलांडलेल्या महाराष्ट्राच्या निशरीन पारिख आणि मध्य प्रदेशच्या सीमा वर्मा यांचे पीळदार सौंदर्य पाहून उपस्थित क्रीडाप्रेमींनी भरभरून दाद दिली.

भारत श्री 2018 च्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेले खेळाडू

पुरूष शरीरसौष्ठव

55 किलो वजनी गट : व्ही. आरिफ (केरळ), एल. नेता सिंग (मणिपूर), संदेश सकपाळ (महाराष्ट्र अ), नितीन शिगवण (महाराष्ट्र ब), जे.जे. चकवर्ती (रेल्वे),पुंदनकुमार गोपे (रेल्वे), आर. बालाजी (तामीळनाडू), एम. रामामूर्ती (तामीळनाडू), टी. रोनीकांत मैतेई (मध्य प्रदेश), सोनू (दिल्ली).

60 किलो वजनी गट : अंकूर (दिल्ली), तानाजी चौगुले (कर्नाटक), नितीन म्हात्रे (महाराष्ट्र अ), प्रतिक पांचाळ (महाराष्ट्र ब), तोंबा सिंग (तेलंगणा), एम. राजू(तेलंगणा), के हरीबाबू (रेल्वे), दिपू दत्ता (आसाम), अजीत सिंग जनवाल (जम्मू कश्मीर), संजयकुमार साहू (ओडिशा)

65 किलो वजनी गट : इम्रान अली ( उत्तर प्रदेश), मित्तलकुमार सिंग (दिल्ली), रियास टी.के. (केरळ), श्रीनिवास खारवी (महाराष्ट्र ब), एस. भास्करन (रेल्वे),बलाल खान (ओडिशा), मनप्रीत सिंग (पंजाब), अनिल गोचीकर (ओडिशा), टी. कृष्णा (मध्य प्रदेश), सुवदीप बैद्य (आसाम).

70 किलो वजनी गट : मोहम्मद वसीम (उत्तर प्रदेश), धर्मेंदर सिंग (दिल्ली), राजू खान (दिल्ली), विक्रमसिंग तोमर (त्रिपूरा), रितेश नाईक (महाराष्ट्र ब), हिरालाल(पंजाब पोलीस), हरिश्चंद्र इंगावले (पुद्दुचेरी), अनास हुसेन (रेल्वे), रश्मी रंजन साहू (ओडिशा), राजकुमार यादव (मध्य प्रदेश).

75 किलो वजनी गट : मोहम्मद सद्दाम (उत्तर प्रदेश), प्रवीण कंबरकर (कर्नाटक), सिद्दू देसनूर (कर्नाटक), सुशील मुरकर ( महाराष्ट्र), व्ही. जयप्रकाश (रेल्वे),रवींद्र वंजारी (महाराष्ट्र ब), जीतू गोगई (मध्य प्रदेश), गौरव कुमार (मध्य प्रदेश), विनय ठाकूर (मध्य प्रदेश), राजीव साहू (मध्य प्रदेश).

80 किलो वजनी गट : राज चौधरी (उत्तर प्रदेश), रविंदर मलिक (गुजरात), सागर कातुर्डे (महाराष्ट्र ब), रशीद इ पी (केरळ), एन. सर्बो सिंग (रेल्वे), सुयश पाटील(महाराष्ट्र अ), बी. महेश्र्वरन (तामीळनाडू), ई. कार्तिक (तामीळनाडू), हरी राम (सीआरपीएफ), राम तुडू (सीआरपीएफ), सुशांत रांजणकर (महाराष्ट्र ब).

85 किलो वजनी गट : नरेंदर यादव ( दिल्ली), अजय नायर (महाराष्ट्र अ), सुजन पिळणकर ( मेजर पोर्ट), देवेंद्र पाल (पुद्दुचेरी), ए. बॉबी सिंग (रेल्वे), प्रीतम चौगुले ( रेल्वे), एस. सतीश कुमार (तामीळनाडू), सचिन चोपडे (गोवा), मिथुन साहा (प.बंगाल), आय. देवा सिंग (मध्य प्रदेश).

90 किलो वजनी गट : विजय बहादूर (उत्तर प्रदेश ), एल. रिशीकांता सिंग (मणिपूर), रिजू पॉल जोस (गुजरात), कुलवीर सिंग यादव (हरयाणा), सुनीत जाधव(महाराष्ट्र अ), महेंद्र चव्हाण ( महाराष्ट्र अ), रोहित शेट्टी (महाराष्ट्र ब), सागर जाधव ( रेल्वे), जगदीश लाड (चंदीगड), एस.के.शुक्ला (मध्य प्रदेश).

90-100 किलो वजनी गट : विक्रमसिंग शेरावत (हरयाणा), लवीन के (कर्नाटक), महेंद्र पगडे (महाराष्ट्र अ), श्रीदीप गावडे (महाराष्ट्र ब), राम निवास (रेल्वे), एस सेंथिल कुमारन (तामीळनाडू), अमित छेत्री (उत्तराखंड), संजॉय साहा (प. बंगाल), समीर खान (मध्य प्रदेश), प्रीतम (सीआरपीएफ).

90 किलो वजनी गट : अनुज कुमार (उत्तर प्रदेश), गुरविंदर सिंग (मणिपूर), योगेश (चंदीगड), सेठी (गुजरात), अतुल आंब्रे ( महाराष्ट्र अ), नितीन बाबू (गुजरात),अक्षय मोगरकर (महाराष्ट्र अ), हरदीप सिंग (पंजाब पोलीस), जावेद अली खान (रेल्वे), सत्यजीत प्रतिहारी (ओडिशा).

महिला शरीरसौष्ठव : जमुना देवी (मणिपूर), ज्योती (दिल्ली), सरिता देवी (मणिपूर), ममोता देवी यमनम (दिल्ली), कांची अडवाणी (महाराष्ट्र अ), गीता सैनी(हरयाणा), रेखा कुमार (छत्तीसगड), वंदना ठाकूर (मध्य प्रदेश).

स्पोर्टस् मॉडेल (महिला) : संजु (उत्तर प्रदेश), एम. जानसी देवी (मणिपूर), अंकिता सिंग (कर्नाटक), रिता तारी (महाराष्ट्र अ), हाशी रॉय (कर्नाटक), स्टेला गोडे(महाराष्ट्र अ), क्लॉडिया जेसिका (मेघालय), मंजिरी भावसार (महाराष्ट्र अ), अनन्या घोषाल (प. बंगाल), सोनिया मित्रा (प.बंगाल).