ऑल इंडिया निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धेत पंजाब, हरयाणा संघांची विजयी आगेकूच

पुणे । पंजाब व हरयाणा संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना ‘आझम स्पोर्ट्स अकादमी’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पाचव्या आबेदा इनामदार ऑल इंडिया निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धे’तील आपली विजयी आगेकूच कायम राखली.

आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज झालेल्या पहिल्या लढतीमध्ये पंजाब संघाने मध्य प्रदेश संघाला ९ गडी राखत पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना मध्यप्रदेश संघाने १९.४ षटकांत सर्वबाद १२० धावा केल्या. अंतरा शर्माने एकाकी झुंज देताना ३५ चेंडूत ३५ धावांची (४ चौकार) खेळी केली. आकांक्षा सिंगने ११ धावा केल्या.

पंजाब संघाच्या इशा चौधरीने १६ धावांत ४ गडी बाद केले. पूजा बोमराडाने २ तर, संगीता सिन्धू, पूजा मेहरा, भावना शर्मा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. पंजाब संघाने १७.४ षटकांत १ बाद १२२ धावा करताना विजय साकारला. मोनिका पांडेने धडाकेबाज फलंदाजी करताना ३१ चेंडूत ७ चौकारांसह ४० धावांची खेळी केली. तिला शिरीन खान ३९ (४२ चेंडू, ४ चौकार) तर, अंबिका पांजला २२ (३० चेंडू, २ चौकार) यांनी सुरेख साथ दिली. गगनदीप कौरने १ गडी बाद केला. पंजाबच्या इशा चौधरीला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दुसऱ्या लढतीमध्ये हरयाणा संघाने सोलापूर जिल्हा क्रिकेट संघाला तब्बल ५७ धावांनी पराभूत करताना आगेकूच कायम राखली. हरयाणा संघाने १८.४ षटकांत सर्वबाद १०७ धावांपर्यंत मजल मारली. संघाकडून नेहा शर्माने ३६ चेंडूत ३८ (५ चौकार) धावांची खेळी केली. तिला परमिला कुमारीने १७ चेंडूत २० (३ चौकार) धावा करताना सुरेख साथ दिली. ऋतू भोसले, वैभवी जगताप व साक्षी बनसोडे यांनी प्रत्येकी २ तर स्वाती पाटील, पूजा बाबर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. विजयासाठी आवश्यक असलेले १०८ धावांचे लक्ष्य सोलापूर संघाला पेलवले नाही.

हरयाणा संघाच्या परमिला कुमारी व नेहा जोशी यांच्या भेदक गोलंदाजीसमोर सोलापूर संघ १५.५ षटकांत सर्वबाद ५० धावात गडगडला. परमिला कुमारीने ४ तर नेहा जोशीने ३ गडी बाद करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सोलापूर संघाकडून ऋतू भोसलेने २२ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २२ धावांची खेळी केली. बाकी सर्व फलंदाज झटपट बाद झाले.

संक्षिप्त धावफलक : मध्यप्रदेश : १९.४ षटकांत सर्वबाद १२० (अंतरा शर्मा ३५ (३५ चेंडू, ४ चौकार), आकांक्षा सिंग ११ (१८ चेंडू, १ चौकार), इशा चौधरी ४-०-१६-४, पूजा बोमराडा ०.४-०-१-२, भावना शर्मा २-०-१०-१) पराभूत विरुद्ध पंजाब : १७.४ षटकांत १ बाद १२२ (मोनिका पांडे ४० (३१ चेंडू, ७ चौकार), शिरीन खान ३९ (४२ चेंडू, ४ चौकार), अंबिका पांजला २२ (३० चेंडू, २ चौकार) गगनदीप कौर ४-०-१९-१)

हरयाणा : १८.४ षटकांत सर्वबाद १०७ (नेहा शर्मा ३८ (३६ चेंडू, ५ चौकार), परमिला कुमारी २० (१७ चेंडू, ३ चौकार) ऋतू भोसले ३.४-०-१४-२, वैभवी जगताप ३-०-११-२, साक्षी बनसोडे १-०-४-२) विजयी विरुद्ध सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटना : १५.५ षटकांत सर्वबाद ५० (ऋतू भोसले २२ (२२ चेंडू, ३ चौकार) परमिला कुमारी ४-०-१०-४, नेहा जोशी ३.५-०-५-३, रजनी दहिया २-०-६-१)