दिल्ली प्रदूषणामुळे सामन्यात व्यत्यय, अखेर विराटने चिडून केला डाव घोषित !

दिल्ली। सध्या दिल्लीत असलेल्या प्रदूषणामुळे दिल्लीकरांना त्रास होत आहेच परंतु आज याच प्रदूषणामुळे भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात अनेकदा व्यत्यय आला.

श्रीलंकेचे खेळाडू सामन्यात पहिल्या सत्रानंतर मास्क घालून मैदानावर उतरले. काही वेळानंतर त्यांनी प्रदूषणामुळे होत असलेल्या त्रासाबद्दल तक्रार केली यामुळे जवळ जवळ २० मिनिटे खेळ थांबला होता. यावेळी पंचांनी चर्चा करून पुन्हा सामना सुरु केला.

यानंतर सामन्यातील १२३ वे षटकात लाहिरू गामागे गोलंदाजी करत असताना त्यालाही त्रास झाला. त्यामुळे तिथेही सामना थोडावेळ थांबवावा लागला त्यामुळे कर्णधार चंडिमलने पंचांकडे तक्रार केली की त्यांच्या जलदगती गोलंदाजांना गोलंदाजी करताना त्रास होत आहे. त्यात प्रकाशझोताचाही प्रश उभा राहत होता.

त्यानंतर गामागे १२५ वे षटक टाकत असताना त्याला पुन्हा अस्वस्थ वाटल्याने त्याचे हे षटक लकमलने पूर्ण केले. या व्यत्ययानंतर लगेचच भारतीय कर्णधार विराट कोहली २४३ धावा करून अखेर बाद झाला.

यानंतर पुन्हा एकदा सामन्याच्या १२७ व्या षटकात सुरंगा लकमल त्याच्या षटकातील ५ चेंडू टाकून मैदानाबाहेर गेला. त्यामुळे पुन्हा एकदा पंचांनी दिनेश चंडिमल आणि अँजेलो मॅथ्यूज यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत श्रीलंका संघाचे व्यवस्थापक असंका गुरुसिंह आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही सहभागी झाले. हे षटक दिलरुवान परेराने पूर्ण केले.

लकमल मैदानाबाहेर गेल्याने श्रीलंकेकडे मैदानावर दहाच खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी असल्याने चंडिमलने खेळ थांबवाला. अखेर अनेकदा श्रीलंकेकडून होत असलेल्या तक्रारींमुळे आणि त्यामुळे येणाऱ्या व्यत्ययांमुळे विराटने चिडून भारताचा पहिला डाव ७ बाद ५३६ धावांवर घोषित केला.

क्रिकेट इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे की प्रदूषणाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला आहे.