अंकुर स्पोर्ट्स क्लब जिल्हास्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत मध्य रेल्वे, युनियन बँक बाद फेरीत

अशोक मंडळ, एच जी एस यांची दुसऱ्या फेरीत धडक.ओमकार कामतेकरने एका चढाईत ५गडी टिपले.

मध्य रेल्वे, युनियन बँक यांनी अंकुर स्पोर्ट्स क्लब व डॉ.शिरोडकर विचार अमृतधारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय विशेष व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला.अशोक मंडळ, एच जी एस यांनी कुमार गटाची दुसरी फेरी गाठली.

लालबाग, गणेश गल्ली येथील स्व.अनिल कुपेरकर क्रीडांगणावर सुरू असलेल्या विशेष व्यावसायिक क गटात मध्य रेल्वेने न्यु इंडिया इन्शुरन्सचा प्रतिकार २७-२४असा मोडून काढत या गटातून प्रथम क्रमांक मिळवीत बाद फेरी गाठली.

श्रीकांत जाधव, मयुर शिवतरकर यांच्या झंजावाती चढाया आणि विराज लांडगेचा भक्कम बचाव याच्या बळावर रेल्वेने पहिल्या डावात दोन लोण देत २१-०८अशी भक्कम आघाडी घेतली. पण दुसऱ्या डावात न्यु इंडियाच्या सुदर्शन किर्वे, अविनाश पाटील यांनी झंजावाती खेळ करीत रेल्वेला जेरीस आणले. शेवटी अनुभवाच्या जोरावर रेल्वेने ३गुणांनी बाजी मारली.

व्यावसायिक ब गटात युनियन बँकेने देखील चुरशीच्या लढतीत सेन्ट्रल बँकेला २७–२७असे बरोबरीत रोखले. रोहित अधटराव, आकाश अडसुल यांच्या चढाई पकडीच्या चतुरस्त्र खेळाने सेंट्रल बॅँकेने मध्यांतराला १६-०९अशी आघाडी राखण्यात यश मिळविले होते.

पण ती आघाडी त्यांना टिकविणे जमले नाही. उत्तरार्धात युनियन बॅँकेच्या अजिंक्य कापरे, संतोष वारकरी यांनी आपला खेळ गतिमान करीत संघाला बरोबरी साधून दिली. एक विजय व एक बरोबरी यामुळे युनियन बॅँकेचा बाद फेरीचा मार्ग मोकळा झाला. अ गटात मध्य रेल्वे विभागाने पी डी हिंदुजा रुग्णालयाचा ४०-३३ असा पराभव केला.

मध्यांतराला दोन्ही संघ १८-१८ असे बरोबरीत होते. रेल्वेकडून शशांक वानखेडे, गौरव भोसले, तर हिंदुजाकडून अक्षय बिडू यांचा खेळ चमकदार झाला. ड गटातील देना बँक-पश्र्चिम रेल्वे हा सामना देखील शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीने खेळला गेला.

त्यात देना बँकेने ३०-२९असा निसटता विजय मिळवीत बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले. पूर्वार्धात १५-१६अशा एका गुणाने पिछाडीवर पडलेल्या बॅँकेने उत्तरार्धात मात्र सावध व कौशल्यपूर्ण खेळ करीत हा विजय साकारला. नितीन देशमुख,पंकज मोहिते यांच्या धारदार चढाया, तर आकाश गोजारे, संकेत सावंत यांच्या धाडशी पकडी यांना या विजयाचे श्रेय जाते. सुनील जयपाल, चेतन,पवनकुमार, रविकुमार यांचा खेळ रेल्वेला विजय मिळवून देण्यात थोडा कमी पडला.

कुमार गटात अशोक मंडळाने चुरशीच्या लढतीत एस एस जी फौंडेशनचा ४९-४३ असा पाडाव करीत दुसरी फेरी गाठली. मध्यांतराला २५-२३अशी अशोक मंडळाकडे आघाडी होती. अशोक मंडळाच्या विजयात ओमकार कामतेकरने एकाच चढाईत ५गडी टिपत महत्वाची भूमिका बजावली.

त्याला चढाईत सुरज सुतारने , तर पकडीत शुभम आंग्रेने मोलाची साथ दिली. त्यामुळे हा विजय साकारण्यास त्यांना यश आले. एस एस जी कडून आकाश चौहान, ऋतिक जाधव यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कडवी लढत दिली. एच जी एसने मध्यांतरातील १८-२८अशा १० गुणांच्या पिछाडीवरून एकताचा विरोध ५३-५२ असा मोडून काढत आगेकूच केली.

साई अहिरे,प्रतीक राणे यांनी एकताला पहिल्या डावात १०गुणांची आघाडी मिळवून दिली होती पण ही आघाडी त्यांना टिकवून ठेवता आली नाही. एच जी एस च्या आयुष मोरे, ओमकार गावडे यांनी ” टॉप गिअर” टाकत उत्तरार्धात तुफानी खेळाचे प्रदर्शन करीत संघाला विजय मिळवून दिला.

कुमार गटाचे अन्य निकाल संक्षिप्त :- १) विजय क्लब वि वि दुर्गामाता ६२-२९, २) शिवनेरी स्पोर्ट्स वि वि सुनील स्पोर्ट्स ४९-२९, ३)शिवशक्ती वि वि बालवीर ५१-३४, ४) जय दत्तगुरु वि वि जय बजरंग ४८-३८.

महत्त्वाच्या बातम्या –