फाफ डुप्लेसिसच्या अनुपस्थितीत हा खेळाडू करणार दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व

दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार फाफ डुप्लेसिसला खांद्याची दुखापत झाल्याने तो उर्वरित दौऱ्यातून बाहेर पडला आहे.

त्यामुळे या दौऱ्यातील उर्वरित 2 वनडे सामन्यांसाठी यष्टीरक्षक फलंदाज क्विंटॉन डीकॉककडे तर एकमेव टी20 सामन्यासाठी जेपी ड्यूमिनीकडे दक्षिण आफ्रिकेचे प्रभारी कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या वरिष्ठ संघाचे नेतृत्व करण्याची डीकॉकची पहिलीच वेळ आहे. याआधी त्याने 2012 ला दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षांखालील संघाचे नेतृत्व केले आहे.

तसेच ड्यूमिनीने याआधीही डुप्लेसिस दुखापतग्रस्त असताना भारताविरुद्ध टी20 मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली आहे.

याबद्दल दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटीस गिब्सन म्हणाले, डीकॉकला क्रिकेटची उत्तम जाण आहे. फाफ डुप्लेसिस दुखापतग्रस्त असल्याने डीकॉककडे नेतृत्व करण्याची चांगली संधी आहे. तो मैदानातही कर्णधाराला मदत करत असतो.

तसेच त्यांनी सांगितले की एडेन मार्करमने भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले होते परंतू तो सध्या या दौऱ्यात संघर्ष करत आहे. त्यामुळे डीकॉककडे नेतृत्व देण्यात आले आहे, ज्यामुळे मार्करमला वेळ मिळेल.

तसेच ड्युमिनीबद्दलही त्यांनी विश्वास दाखवला आहे.

डीकॉक या निवडीबद्दल म्हणाला, तो यासाठी उत्साही आहे आणि डुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघाने केलेली विजयी घौडदौड कायम राखण्याचे ध्येय आहे.

दक्षिण आफ्रिका श्रीलंकेविरुद्ध 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका चौथा वनडे सामना 8 आॅगस्टला होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

इंग्लंड येणार गोत्यात?, महत्त्वाचा खेळाडू अडकला कायद्याच्या कचाट्यात

-फलंदाजाचे शतक होऊ नये म्हणुन क्रिकेटमध्ये घडला हा घाणेरडा प्रकार